स्वारगेट-कात्रज भुयारी मेट्रोला वेग; 5 स्थानकांचा समावेश, डिसेंबर 2030 पर्यंत सेवा सुरू करण्याचे लक्ष्य.
पुणे | 9 सप्टेंबर 2026 : दक्षिण पुण्यातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी महत्त्वाच्या स्वारगेट-कात्रज भुयारी मेट्रो प्रकल्पाबाबत मोठे अपडेट समोर आले आहे. महामेट्रोने डिसेंबर 2030 पर्यंत कात्रजपर्यंत मेट्रो सेवा सुरू करण्याचे लक्ष्य निश्चित केले आहे.
स्वारगेट ते कात्रज हा सुमारे 5.46 किमीचा संपूर्ण भुयारी मार्ग असणार आहे. या कामासाठी 4 टनेल बोरिंग मशीन (TBM) वापरण्यात येणार असून, त्यापैकी दोन TBM लवकरच पुण्यात दाखल होणार आहेत. एका TBMद्वारे दररोज सुमारे 10 मीटर बोगदा खोदण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
या मार्गावर 5 प्रमुख स्थानकांचा समावेश करण्यात आला आहे. त्यामध्ये मार्केट यार्ड, बिबवेवाडी, पद्मावती, बालाजीनगर आणि कात्रज या स्थानकांचा समावेश आहे.
स्थानकांच्या कामाला विलंब होऊ नये यासाठी त्यांचे बांधकाम टप्प्याटप्प्याने न करता समांतर पद्धतीने करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. कात्रज ते शनिवारवाडा दरम्यानच्या ऐतिहासिक दगडी जलवाहिन्यांमुळे मेट्रोच्या भुयारी कामाला अडथळा येणार नसल्याचेही महामेट्रोने स्पष्ट केले आहे.
भविष्यात चाकण, कोंढवा, खडकवासला आणि पुरंदर विमानतळापर्यंत मेट्रोचे जाळे विस्तारण्याचे नियोजन असून, पुण्यात सुमारे 240 किमीचे मेट्रो नेटवर्क उभारण्याचे उद्दिष्ट आहे.


