Home Breaking News शाब्बास पोरींनो! भारताच्या वाघिणींचा पाकिस्तानवर दणदणीत विजय; ७ विकेट्सने सामना जिंकला

शाब्बास पोरींनो! भारताच्या वाघिणींचा पाकिस्तानवर दणदणीत विजय; ७ विकेट्सने सामना जिंकला

28
0

शाब्बास पोरींनो! भारताच्या वाघिणींचा पाकिस्तानवर दणदणीत विजय; ७ विकेट्सने सामना जिंकला

पाकिस्तानचा डाव अवघ्या ५५ धावांत गुंडाळला; दीप्ती शर्मा-हरमनप्रीत कौरची संयमी फलंदाजी, भारताचा सलग तिसरा विजय

मुंबई | ५ सप्टेंबर २०२६ :

महिला आशिया कप २०२६ मध्ये भारताने पाकिस्तानचा ७ विकेट्सने पराभव करत दणदणीत विजय मिळवला. या विजयासह भारतीय महिला संघाने ग्रुप स्टेजमधील सलग तिसरा सामना जिंकत आपले वर्चस्व कायम राखले.

नाणेफेक जिंकून पाकिस्तानच्या कर्णधार फातिमा सनाने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र भारतीय फिरकी

गोलंदाजांसमोर पाकिस्तानच्या फलंदाजांचा निभाव लागला नाही. पाकिस्तानचा संपूर्ण संघ अवघ्या ५५ धावांवर ऑलआऊट झाला.

पाकिस्तानकडून मुनीबा अलीने १३, तर शवाल जुल्फिकारने १४ धावा केल्या. या दोघींव्यतिरिक्त पाकिस्तानच्या एकाही फलंदाजाला दुहेरी आकडा गाठता आला नाही. कर्णधार फातिमा सनाही खाते न उघडताच माघारी परतली.

भारताकडून श्री चरणी आणि प्रेमा रावत यांनी प्रत्येकी ३ विकेट्स घेत पाकिस्तानच्या फलंदाजीचे कंबरडे मोडले. दीप्ती शर्माने २, तर शेफाली वर्माने १ विकेट घेतली.

५६ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारताची सुरुवातही अडखळत झाली. शेफाली वर्मा १२, स्मृती मानधना ९ आणि प्रतिका रावल ४ धावांवर बाद झाल्या.

यानंतर कर्णधार हरमनप्रीत कौर आणि दीप्ती शर्मा यांनी डाव सावरला. दोघींनी संयमी फलंदाजी करत नाबाद २८ धावांची भागीदारी रचली आणि भारताला विजय मिळवून दिला.
हरमनप्रीत कौरने नाबाद १८, तर दीप्ती शर्माने नाबाद १४ धावा केल्या. हरमनप्रीतने षटकार ठोकत भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.

या विजयासह भारताने ग्रुप स्टेजमधील तिन्ही सामने जिंकत ६ गुणांसह आपले स्थान मजबूत केले आहे. दुसरा सामना जिंकल्यानंतरच भारताने उपांत्य फेरीतील स्थान निश्चित केले होते. आता सलग तिसऱ्या विजयामुळे भारतीय संघ अजिंक्य राहिला आहे.

पाकिस्तानविरुद्धच्या या शानदार विजयामुळे भारतीय महिला संघाचा आत्मविश्वास आणखी उंचावला असून, आशिया कपच्या पुढील टप्प्यातही संघाकडून दमदार कामगिरीची अपेक्षा आहे.