सिप्ला फार्माच्या पुण्यातील C&F युनिटचा औषध विक्री परवाना रद्द; FDAची कठोर कारवाई.
पुणे | २८ ऑगस्ट २०२६ : महाराष्ट्र अन्न व औषध प्रशासनाने (FDA) सिप्ला फार्मा अँड लाईफ सायन्सेस लिमिटेडच्या पुण्यातील वाडकी येथील कॅरींग अँड फॉरवर्डिंग (C&F) युनिटचा औषध विक्री परवाना २७ ऑगस्टपासून रद्द केला आहे. औषधांची साठवणूक, नोंदी, पॅकेजिंग आणि बाजारातून औषधे परत मागवण्याच्या प्रक्रियेत गंभीर अनियमितता आढळल्याने ही कारवाई करण्यात आली.
FDAच्या तपासणीत ‘रिअॅक्टिन प्लस’ गोळ्यांच्या पॅकेजिंगवर अनधिकृत दावा करण्यात आल्याचे निदर्शनास आले. हे औषध Schedule H अंतर्गत येत असून, त्याचे वर्णन ‘वेदनानाशक आणि ताप कमी करणारे’ असे करण्यात आले होते. आवश्यक परवानगीशिवाय हा दावा केल्याचा FDAचा आक्षेप होता. याप्रकरणी सुमारे ११.९१ लाख रुपये किमतीचा औषधसाठा जप्त करण्यात आला.
कंपनीला सदोष लेबलिंग असलेल्या औषधांचा बाजारातून रिकॉल करण्याचे निर्देश देण्यात आले होते. मात्र, या सूचनांचे पूर्णपणे पालन न झाल्याचे FDAच्या तपासणीत समोर आले.
याशिवाय, गोदामातील औषधे थेट जमिनीवर ठेवलेली, पॅलेट्स व रॅकची अपुरी व्यवस्था, प्रत्यक्ष औषधसाठा आणि संगणकीकृत नोंदींमध्ये तफावत तसेच मुदतबाह्य औषधांच्या नोंदी व हाताळणी प्रक्रियेत त्रुटी आढळल्या.
तपासणीनंतर FDAने कंपनीला कारणे दाखवा नोटीस बजावली. कंपनीचे स्पष्टीकरण तपासल्यानंतर नियमांचे उल्लंघन आणि रिकॉल निर्देशांचे अपुरे पालन झाल्याचा निष्कर्ष काढण्यात आला आणि परवाना रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला.
FDA आयुक्त तुकाराम मुंढे यांनी औषध सुरक्षा आणि सार्वजनिक आरोग्याच्या बाबतीत कोणालाही सवलत दिली जाणार नसल्याचे स्पष्ट केले. औषधांच्या उत्पादन, विक्री, साठवणूक आणि वितरणामध्ये नियमांचे उल्लंघन झाल्यास कायद्यानुसार कठोर कारवाई केली जाईल, असा इशाराही त्यांनी दिला.
मुख्य मुद्दे :
वाडकी येथील सिप्ला C&F युनिटचा औषध विक्री परवाना रद्द
‘रिअॅक्टिन प्लस’च्या पॅकेजिंगवर अनधिकृत दावा
सुमारे ₹११.९१ लाखांचा औषधसाठा जप्त
औषध रिकॉल प्रक्रियेत नियमांचे अपुरे पालन
साठवणूक व स्टॉक नोंदींमध्ये गंभीर त्रुटी
FDA आयुक्त तुकाराम मुंढे यांची कठोर कारवाई

