पुण्यात १४ दिवस जमावबंदी; मोर्चे, शस्त्रे आणि भडकावू कृत्यांवर पोलिसांचा कडक पहारा.

पुणे : आगामी सण, राजकीय-सामाजिक कार्यक्रम, आंदोलने आणि संवेदनशील घटनांच्या पार्श्वभूमीवर पुणे शहरातील कायदा व सुव्यवस्था कायम ठेवण्यासाठी पोलिसांनी १८ ऑगस्ट ते ३१ ऑगस्ट २०२६ या कालावधीत प्रतिबंधात्मक आदेश लागू केले आहेत. महाराष्ट्र पोलीस कायदा, १९५१ मधील कलम ३७(१), ३७(२) आणि ३७(३) अंतर्गत हा आदेश जारी करण्यात आला आहे.
पोलिस उपायुक्त (विशेष शाखा) डॉ. प्रशांत अमृतकर यांनी हा आदेश काढला असून, त्याची अंमलबजावणी १८ ऑगस्ट रोजी मध्यरात्री १२.०१ वाजल्यापासून ३१ ऑगस्टच्या मध्यरात्रीपर्यंत राहणार आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, शहरात विविध राजकीय पक्ष आणि सामाजिक संघटनांकडून मोर्चे, निदर्शने, बंद तसेच आंदोलने आयोजित केली जातात. तसेच संवेदनशील विषयांवरून तणाव निर्माण होण्याची शक्यता असल्याने सार्वजनिक शांतता आणि सुरक्षितता राखण्यासाठी हे प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आले आहेत.
आदेशानुसार सार्वजनिक ठिकाणी शस्त्रे, दांडे, ज्वलनशील किंवा स्फोटक पदार्थ तसेच शारीरिक इजा करण्यासाठी वापरता येतील अशा वस्तू बाळगण्यास मनाई करण्यात आली आहे. तसेच कायदा-सुव्यवस्थेवर परिणाम होईल अशा पद्धतीने व्यक्ती, नेते किंवा संस्थांच्या प्रतीकात्मक पुतळ्या, प्रतिमा किंवा मूर्ती प्रदर्शित करणे अथवा जाळणे यावरही निर्बंध आहेत.
सार्वजनिक ठिकाणी भडकावू भाषणे करणे, आक्षेपार्ह घोषणा देणे, चिथावणीखोर गाणी किंवा सामाजिक सलोखा बिघडविणाऱ्या कृती करणे आढळल्यास संबंधितांवर पोलिसांकडून कायदेशीर कारवाई केली जाऊ शकते.
सोशल मीडियावरील भडकावू कंटेंटवरही पोलिसांची नजर असून, गुन्हेगारांचे उदात्तीकरण करणारे व्हिडिओ तयार करणे किंवा प्रसारित करणे, धमकी देणे, दहशत निर्माण करणारा मजकूर अथवा संदेश पसरवणे यासारख्या प्रकारांवरही कारवाई केली जाणार आहे.
शहरातील शांतता आणि कायदा-सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी नागरिकांनी प्रशासनाच्या आदेशांचे पालन करावे, असे आवाहन पुणे पोलिसांकडून करण्यात आले आहे.


