पुणे ग्रामीण पोलिसांची धडक कारवाई; चोरी, मारहाण, फसवणूक अन् अवैध शस्त्रांवर गुन्हे दाखल.

पुणे, दि. ११ ऑगस्ट २०२६ : पुणे ग्रामीण पोलिसांनी जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यांच्या हद्दीत झालेल्या गुन्ह्यांवर कारवाई करत चोरी, घरफोडी, मारहाण, फसवणूक, अवैध शस्त्र बाळगणे तसेच शासकीय कामात अडथळा आणणे अशा विविध प्रकरणांत गुन्हे दाखल केले आहेत. इंदापूर, मंचर, जुन्नर, सासवड, शिक्रापूर, आळेफाटा आणि बारामती परिसरात या कारवाया करण्यात आल्या आहेत.
इंदापूर तालुक्यातील भांडगाव येथे देवस्थानाच्या यात्रेदरम्यान तरुणाला मारहाण केल्याची घटना घडली. ७ ऑगस्ट रोजी दुपारी सुमारे २ वाजता ही घटना घडली. यात्रेसाठी गेलेल्या फिर्यादीचा काही जणांशी वाद झाला. त्यानंतर त्याला मंदिराच्या मागे नेऊन लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यात आली. तसेच लोखंडी गजाने डोक्यावर, पायावर, मांडीवर आणि इतर ठिकाणी मारहाण करून दुखापत केल्याची तक्रार आहे. या प्रकरणी इंदापूर पोलिसांनी पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
तसेच इंदापूर तालुक्यातील निमगाव केतकी येथे रस्त्याच्या वापरावरून वाद झाल्याचे समोर आले आहे. फिर्यादीच्या घराच्या मागील बाजूस असलेल्या रस्त्यावरून वाहन जाण्याच्या कारणावरून वाद झाला. यावेळी महिलेसह कुटुंबातील व्यक्तींना शिवीगाळ व मारहाण केल्याची तक्रार दाखल करण्यात आली आहे.
मंचरमध्ये गोदाम फोडून लाखोंचा मुद्देमाल चोरीला
मंचर परिसरातील मांगवाडा येथे हार्डवेअरच्या पत्राशेड गोदामाचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी चोरी केली. जुन्या तांबे-पितळ भांड्यांचे स्क्रॅप तसेच कंपनीचे सीसीटीव्ही डीव्हीआर मशीन असा एकूण ३ लाख ८२ हजार ७०० रुपयांचा मुद्देमाल चोरीला गेला. या प्रकरणी मंचर पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
जुन्नर कृषी बाजार समितीतून ७३ हजार ५०० रुपयांची रोकड लंपास
जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कार्यालयातून रोख रक्कम आणि धनादेश असलेली पिशवी चोरीला गेली. कार्यालयातील टेबलवर ठेवलेली पिशवी अज्ञात व्यक्तीने लंपास केल्याचे तक्रारीत नमूद आहे. त्यामध्ये ७३ हजार ५०० रुपयांची रोकड तसेच विविध बँकांचे कोरे धनादेश होते. या प्रकरणी जुन्नर पोलिसांनी चोरीचा गुन्हा दाखल केला आहे.
सासवडमध्ये वृद्ध महिलेची फसवणूक; सोन्याचे दागिने लंपास
सासवड परिसरात ७२ वर्षीय महिलेची दोन अनोळखी व्यक्तींनी फसवणूक केल्याची घटना समोर आली आहे. दहा तोळ्यांच्या बिस्किटांचे आमिष दाखवून आरोपींनी महिलेच्या अंगावरील सोन्याचे दागिने काढून घेतल्याची तक्रार आहे. या प्रकारात सुमारे एक लाख रुपयांचे सोन्याचे दागिने लंपास झाल्याचे नमूद आहे. सासवड पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.
शिक्रापूरमध्ये घरफोडी; २.३३ लाखांचा ऐवज चोरीला
शिक्रापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील टाकळी भीमा येथील पाचरणेवस्ती परिसरात अज्ञात चोरट्याने घरात प्रवेश करून चोरी केली. ७ ऑगस्टच्या रात्री साडेसातपासून ८ ऑगस्टच्या पहाटे सव्वा एक वाजेपर्यंतच्या कालावधीत ही घरफोडी झाल्याचे तक्रारीत नमूद आहे. चोरट्याने २ लाख ३३ हजार रुपयांचा ऐवज लंपास केला. यात सोन्याच्या बांगड्या, सोन्याच्या अंगठ्या आणि ८३ हजार रुपयांची रोकड यांचा समावेश आहे.
हॉटेलमध्ये मोबाईल चार्जिंगवरून वाद; मारहाण व तोडफोड
शिक्रापूर परिसरातील जुन्या राजवाडा हॉटेलमध्ये मोबाईल चार्जिंगच्या कारणावरून वाद झाला. आरोपीने शिवीगाळ व दमदाटी करत फिर्यादीला मारहाण केल्याची तक्रार आहे. त्यानंतर हॉटेलमध्ये पुन्हा येऊन लोकांसमोर शिवीगाळ व दमदाटी करत दुकानातील खुर्च्या-टेबल आपटून नुकसान केल्याचेही तक्रारीत नमूद आहे. या प्रकरणी शिक्रापूर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
आळेफाटा येथे तरुणीची आत्महत्या; मानसिक त्रासाचा आरोप
आळेफाटा परिसरात २५ वर्षीय तरुणीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली. पोलिसांकडे दाखल तक्रारीनुसार, तरुणीला मानसिक त्रास देण्यात आल्याचा आरोप आहे. १० ऑगस्ट रोजी रात्री सुमारे १०.४० वाजता तिला गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आले. या प्रकरणी आळेफाटा पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.
बारामतीत गावठी पिस्तूल व दोन जिवंत काडतुसे जप्त
बारामती शहरातील फलटण चौक परिसरात पोलिसांनी कारवाई करून एका २७ वर्षीय तरुणाकडून गावठी बनावटीचे पिस्तूल आणि त्यासोबत दोन जिवंत काडतुसे जप्त केली. जप्त शस्त्र व काडतुसांची एकूण किंमत सुमारे २५ हजार ४०० रुपये असल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे. संबंधित तरुणाविरुद्ध शस्त्रास्त्र कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
इंदापूरमध्ये दोन तरुणांकडून गावठी पिस्तूल व तीन काडतुसे जप्त
इंदापूर तालुक्यातील मदनवाडी परिसरात पोलिसांनी आणखी एक कारवाई केली. दोन तरुणांकडून चॉकलेटी रंगाचे गावठी बनावटीचे पिस्तूल आणि तीन जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली. जप्त मुद्देमालाची एकूण किंमत सुमारे ४० हजार ६०० रुपये आहे. या प्रकरणी दोघांविरुद्ध शस्त्रास्त्र कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बारामती न्यायालय परिसरात शासकीय कामात अडथळा
बारामती येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालय परिसरात शासकीय कामात अडथळा आणल्याचा प्रकार घडला. पोलिसांच्या तक्रारीनुसार, आरोपीने सरकारी कामात अडथळा निर्माण करून पोलिस कर्मचाऱ्याला जोराचा धक्का दिला. त्यामुळे पोलिस कर्मचाऱ्याच्या पायाला दुखापत झाली. घटनेनंतर पोलिसांनी पाठलाग करून आरोपीला पकडले. या प्रकरणी बारामती शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान, पुणे ग्रामीण पोलिसांच्या या कारवायांमुळे जिल्ह्यात चोरी, फसवणूक, मारहाण आणि अवैध शस्त्र बाळगणाऱ्यांवर पोलिसांची करडी नजर असल्याचे स्पष्ट झाले आहे. विविध पोलीस ठाण्यांमध्ये दाखल झालेल्या या गुन्ह्यांचा पुढील तपास सुरू आहे.


