जुन्नर हादरले! चिमुकलीवर अत्याचारानंतर हत्या; गावात संताप.
जुन्नर: दि.१९ ऑगस्ट : पिंपळवंडी येथील साडेनऊ वर्षांच्या चिमुकलीवर लैंगिक अत्याचार करून हत्या केल्याच्या घटनेने जुन्नर तालुका हादरला आहे. मंगळवारी (१८ ऑगस्ट) दुपारी मुलगी बेपत्ता झाल्यानंतर कुटुंबीयांनी पोलिसांकडे तक्रार दिली. त्यानंतर पोलिसांनी शोधमोहीम सुरू केली असता मुलीचा मृतदेह आढळून आला.
प्राथमिक तपासानुसार, घराशेजारी राहणाऱ्या एका तरुणाने ओळखीचा गैरफायदा घेत मुलीला सायकलवरून उसाच्या शेताच्या परिसरात नेल्याचा संशय आहे. तेथे तिच्यावर अत्याचार करून गळा दाबून हत्या केल्याचा पोलिसांना संशय असून, संबंधित तरुणाला ताब्यात घेऊन त्याची कसून चौकशी सुरू आहे.
घटनेची माहिती मिळताच पुणे जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल्ल यांनी घटनास्थळी भेट देऊन तपासाचा आढावा घेतला. पोलिसांच्या विविध पथकांकडून घटनास्थळाची पाहणी, पुरावे संकलन आणि घटनेमागील नेमके कारण याचा तपास सुरू आहे. दोषींवर कायद्यानुसार कठोर कारवाई केली जाईल, असे पोलिसांकडून सांगण्यात आले.
दरम्यान, या घटनेनंतर पिंपळवंडी परिसरात संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. आरोपीला कठोरात कठोर शिक्षा देण्याची तसेच तपास जलदगतीने पूर्ण करून पीडित कुटुंबाला न्याय देण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
