Home Breaking News धर्मपुरीत संत ज्ञानेश्वर महाराज पालखीचे भक्तिमय स्वागत; पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी केले...

धर्मपुरीत संत ज्ञानेश्वर महाराज पालखीचे भक्तिमय स्वागत; पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी केले पादुका पूजन.

25
0

धर्मपुरीत संत ज्ञानेश्वर महाराज पालखीचे भक्तिमय स्वागत; पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी केले पादुका पूजन.

पंढरपूर, दि. 19 : आषाढी वारीनिमित्त पंढरपूरकडे प्रस्थान ठेवलेल्या श्री संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचे धर्मपुरी येथे भक्तिमय वातावरणात आणि मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले. ग्रामविकास विभाग व सोलापूर जिल्हा प्रशासनाच्या वतीने पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी श्रींच्या पादुकांचे दर्शन घेऊन पूजन केले तसेच पुष्पहार अर्पण करून पालखीचे स्वागत केले. यावेळी जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांनीही पादुकांचे पूजन केले. सोलापूर जिल्हा प्रशासनाच्या वतीने पालखी रथावर पुष्पवृष्टी करण्यात आली. टाळ-मृदंगाच्या गजरात पालकमंत्री जयकुमार गोरे काही अंतर पालखीसोबत पायी चालत सहभागी झाले.

धर्मपुरी पालखीतळावर वारकरी, भाविक आणि ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली होती. “राम कृष्ण हरी” आणि “ज्ञानोबा माऊली, तुकाराम” या जयघोषांनी संपूर्ण परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला. पोलीस बँड पथकाने भक्तिमय धून सादर करून पालखीचे स्वागत केले. यावेळी जिल्हा प्रशासनाच्या वतीने श्री संत ज्ञानेश्वर महाराज संस्थानचे प्रमुख विश्वस्त ह.भ.प. भावार्थ देखणे महाराज यांचाही सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाला आमदार उत्तम जानकर, जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन, सातारा जिल्हाधिकारी संतोष पाटील, सोलापूर पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी, सातारा पोलिस अधीक्षक निखिल पिंगळे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन, माजी आमदार रणजितसिंह मोहिते-पाटील यांच्यासह अनेक अधिकारी व पदाधिकारी उपस्थित होते.

पालखी सोहळ्यासाठी धर्मपुरी येथे जिल्हा प्रशासनाने पिण्याचे पाणी, स्वच्छता, वैद्यकीय सेवा, वीज, वाहतूक आणि कायदा-सुव्यवस्थेची चोख व्यवस्था केली आहे. आरोग्य विभागामार्फत वारकऱ्यांची प्राथमिक आरोग्य तपासणी करण्यात येत असून जिल्हा परिषदेने हिरकणी कक्ष सुरू केला आहे. तसेच भाविकांच्या पायांना आराम मिळावा यासाठी फूट मसाज मशीनची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली असून हजारो वारकरी त्याचा लाभ घेत आहेत. आरोग्य दूत आणि आरोग्य बाईकच्या माध्यमातूनही वारकऱ्यांना तत्पर आरोग्यसेवा पुरविण्यात येत आहे.