महाराष्ट्रात मुसळधार पावसाचे पुनरागमन; अनेक जिल्ह्यांना रेड-ऑरेंज अलर्ट.

मुंबई : राज्यातील पावसाने घेतलेली विश्रांती संपुष्टात येत पुन्हा एकदा मुसळधार पावसाने जोर धरला आहे. भारतीय हवामान विभागाने (IMD) पुढील २४ तास राज्यातील अनेक भागांसाठी अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला असून, विविध जिल्ह्यांसाठी रेड, ऑरेंज आणि यलो अलर्ट जारी केला आहे.
मुंबई, ठाणे, पुणे, छत्रपती संभाजीनगर, जालना तसेच विदर्भातील अनेक भागांत जोरदार पाऊस सुरू आहे. पुणे जिल्ह्यातील घाटमाथ्यावर रेड अलर्ट जारी करण्यात आला असून, ठाणे, रायगड, पालघर, नाशिक, सातारा घाटमाथा आणि कोल्हापूर येथे अतिमुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. मुंबई, पुणे, रत्नागिरी, नाशिक आणि विदर्भातील काही भागांत वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.
हवामान विभागानुसार, कमी दाबाचा पट्टा सक्रिय झाल्यामुळे राज्यात पावसाचा जोर वाढला आहे. त्यामुळे नागरिकांनी विशेषतः घाट परिसर आणि नदीकाठच्या भागात सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
दरम्यान, नाशिक जिल्ह्यात सुरू असलेल्या संततधार पावसामुळे कडवा, भावली आणि पालखेड धरणांतून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. प्रशासनाने नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला असून, धरणांच्या पाणलोट क्षेत्रातही जोरदार पाऊस सुरू असल्याने पाणीसाठ्यात सातत्याने वाढ होत आहे.
जालना जिल्ह्यात मध्यरात्रीपासून सुरू असलेल्या रिमझिम ते मध्यम पावसामुळे खरीप पिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. अनियमित पावसामुळे चिंतेत असलेल्या शेतकऱ्यांना या पावसामुळे दिलासा मिळाल्याचे चित्र असून, सोयाबीन, कापूस, तूर आणि मका पिकांसाठी हा पाऊस लाभदायक ठरत आहे.