Home Breaking News महाराष्ट्रात पावसाचा कहर! पुढील 24 तास अतिमहत्त्वाचे; विदर्भातील चार जिल्ह्यांना रेड अलर्ट,...

महाराष्ट्रात पावसाचा कहर! पुढील 24 तास अतिमहत्त्वाचे; विदर्भातील चार जिल्ह्यांना रेड अलर्ट, अनेक भागांत पूरस्थिती.

52
0

महाराष्ट्रात पावसाचा कहर! पुढील 24 तास अतिमहत्त्वाचे; विदर्भातील चार जिल्ह्यांना रेड अलर्ट, अनेक भागांत पूरस्थिती.

मुंबई : 31 जुलै 2026:राज्यात मान्सूनने पुन्हा जोर धरला असून पुढील 24 तास अत्यंत महत्त्वाचे असल्याचा इशारा भारतीय हवामान विभागाने (IMD) दिला आहे. ओडिशावरील तीव्र कमी दाबाचा पट्टा पश्चिम विदर्भ आणि छत्तीसगडकडे सरकत असल्याने विदर्भ, मध्य महाराष्ट्र, खानदेश, मराठवाडा, कोकण आणि घाटमाथ्यावर मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया आणि जळगाव जिल्ह्यांसाठी रेड अलर्ट जारी करण्यात आला असून नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.
विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये पावसामुळे गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. अमरावती जिल्ह्यातील नांदगाव खंडेश्वर तालुक्यात ढगफुटीसदृश पाऊस झाल्याने नदी-नाल्यांना पूर आला. धामक, धानोरा गुरव, मंगरूळ चव्हाळा, खेड पिंपरी, परसमंडळ आणि दिघी कोल्हे या गावांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली असून सुमारे 100 नागरिकांना सुरक्षितस्थळी हलवण्यात आले आहे. सातरगाव परिसरात एका दुचाकीस्वाराचा पुरात वाहून गेल्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे. खबरदारी म्हणून तालुक्यातील सर्व शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.
यवतमाळ जिल्ह्यातही संततधार पावसामुळे अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. जिल्हाधिकारी विकास मीना यांनी विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने सर्व शाळा आणि महाविद्यालयांना एक दिवसाची सुट्टी जाहीर केली आहे. नागरिकांनी विनाकारण घराबाहेर पडू नये, नदी-नाले आणि पूरग्रस्त भागांपासून दूर राहावे तसेच पाण्याखाली गेलेले रस्ते आणि पूल ओलांडू नयेत, अशा सूचना प्रशासनाने दिल्या आहेत.
बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर आणि जळगाव जामोद तालुक्यांत अतिवृष्टीमुळे सातपुडा पर्वतरांगांमध्ये ढगफुटीसदृश पाऊस झाला. अनेक नद्या आणि ओढ्यांना पूर आल्याने राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 161G वरील वाहतूक विस्कळीत झाली असून अनेक शेतांमध्ये पाणी शिरल्याने पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.
मुंबई, ठाणे आणि पुण्यासह राज्यातील प्रमुख शहरांमध्येही पावसाचा जोर कायम आहे. ठाण्यात यलो अलर्ट जारी करण्यात आला असून गेल्या 22 तासांत 31.29 मिमी पावसाची नोंद झाली आहे. मध्य रेल्वेची वाहतूक 5 ते 7 मिनिटे उशिराने सुरू आहे. पुण्यात मध्यम ते जोरदार पावसासह मेघगर्जनेची शक्यता असून घाट परिसरात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज आहे.
हवामान विभागाने पालघर, नाशिक, धुळे, छत्रपती संभाजीनगर, जालना, अमरावती, वर्धा, नागपूर आणि भंडारा या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट दिला आहे. अचानक पूर, भूस्खलन आणि जोरदार वाऱ्यांचा धोका लक्षात घेता नागरिकांनी सतर्क राहावे, स्थानिक प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे आणि अत्यावश्यक कामाशिवाय प्रवास टाळावा, असे आवाहन करण्यात आले आहे.