Home Breaking News पुणे : हिंगणे-धनकवडी बोगद्यामुळे सिंहगड रस्ता ते सातारा रस्ता अवघ्या १० मिनिटांत

पुणे : हिंगणे-धनकवडी बोगद्यामुळे सिंहगड रस्ता ते सातारा रस्ता अवघ्या १० मिनिटांत

20
0

पुणे : हिंगणे-धनकवडी बोगद्यामुळे सिंहगड रस्ता ते सातारा रस्ता अवघ्या १० मिनिटांत.

पुणे, ता. १९ : पुणे शहरातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी महापालिकेने महत्त्वाकांक्षी हिंगणे-धनकवडी बोगदा प्रकल्प हाती घेतला असून, या प्रकल्पासाठी लवकरच निविदा प्रक्रिया सुरू केली जाणार आहे. नरवीर तानाजी मालुसरे (सिंहगड) रस्ता आणि सातारा रस्ता यांना थेट जोडणाऱ्या या बोगद्याचा सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) अंतिम टप्प्यात असून, कामाला लवकरच सुरुवात होण्याची शक्यता आहे.

सध्या हिंगणे ते धनकवडीदरम्यान तळजाई टेकडीमुळे वाहनचालकांना स्वारगेट किंवा कात्रजमार्गे सुमारे ७.५ ते ९ किलोमीटरचा वळसा घालावा लागतो. त्यामुळे ४० ते ५० मिनिटांचा प्रवास करावा लागतो. प्रस्तावित बोगदा पूर्ण झाल्यानंतर हे अंतर अवघ्या ५ ते १० मिनिटांत पार करता येणार असून, वाहतूक कोंडी, इंधनाचा वापर आणि प्रवासाचा वेळ मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे.

या प्रकल्पात एकूण २.४ किलोमीटरचा मार्ग विकसित केला जाणार असून, त्यामध्ये ९३० मीटर लांबीचा चार-लेन बोगदा तसेच दोन्ही बाजूंना ॲप्रोच रस्ते उभारले जाणार आहेत. हा बोगदा शहराच्या इंटरमिजिएट रिंग रोड (IRR) नेटवर्कमधील महत्त्वाचा दुवा ठरणार असून, सिंहगड रस्ता आणि सातारा रस्ता परिसरातील वाहतुकीवरील ताण कमी करण्यास मदत होईल. प्रकल्पासाठी पर्यावरणीय मंजुरी, भूसंपादन आणि आर्थिक तरतूद या प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर प्रत्यक्ष कामाला सुरुवात होणार आहे.

दरम्यान, वाकडेवाडी परिसरातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी साखर संकुल ते जुना पुणे-मुंबई महामार्ग जोडणारा ७३.५२ कोटी रुपयांचा उड्डाणपूल व ग्रेड सेपरेटर उभारण्याच्या प्रस्तावालाही स्थायी समितीने मंजुरी दिली आहे. या प्रकल्पामुळे गणेशखिंड रस्त्यावरून पुणे-मुंबई महामार्गाकडे जाणारी वाहतूक अधिक वेगवान होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.