आषाढी वारीची उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून पाहणी; वारकऱ्यांच्या सुविधांसाठी अतिरिक्त ५ कोटींचा निधी मंजूर

पंढरपूर, दि. १९ : आषाढी वारी २०२६ च्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रविवारी पंढरपूर येथे वारकऱ्यांसाठी करण्यात आलेल्या विविध सुविधांची प्रत्यक्ष पाहणी केली. दर्शन रांगेतील भाविकांना स्वतःच्या हस्ते पाण्याच्या बाटल्यांचे वाटप करत त्यांनी वारकऱ्यांशी संवाद साधला आणि त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. तसेच चंद्रभागा नदीपात्र, वाळवंट परिसर, वैद्यकीय कक्ष आणि आपत्कालीन सेवा केंद्रांची पाहणी करून संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना दिल्या.
पाहणीदरम्यान उपमुख्यमंत्री शिंदे यांनी होडीतून चंद्रभागा नदीतील स्वच्छतेची पाहणी केली. स्वच्छता कर्मचाऱ्यांशी संवाद साधून सुरक्षित साधनांचा वापर करण्याच्या सूचना दिल्या. भक्तीसागर येथील आपत्कालीन कक्षाला भेट देत आयसीयूमधील रुग्णांची विचारपूस केली आणि डॉक्टरांशी उपचार व्यवस्थेबाबत चर्चा केली. यावेळी त्यांनी परिसरात वृक्षारोपणही केले.
दरम्यान, यात्रेदरम्यान वारकऱ्यांना अधिक चांगल्या सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी उपमुख्यमंत्री शिंदे यांनी पंढरपूर नगरपरिषदेला अतिरिक्त ५ कोटी रुपयांचा निधी तातडीने मंजूर केला. यापूर्वीही राज्य सरकारने यात्रेसाठी ५ कोटी रुपयांचे अनुदान दिले असून, आता एकूण १० कोटी रुपयांच्या निधीतून पाणीपुरवठा, स्वच्छता, आरोग्य सेवा आणि इतर नागरी सुविधा अधिक प्रभावीपणे उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. “वारकऱ्यांना कोणतीही गैरसोय होऊ नये, यासाठी शासन आणि प्रशासन २४ तास सज्ज असून आषाढी वारी निर्विघ्न पार पाडण्यासाठी सर्व यंत्रणा कार्यरत आहेत,” असे उपमुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी सांगितले.