Home Breaking News नसरापूर प्रकरणात भीमराव कांबळेला मरपर्यंत फाशी;  पुण्यातील विशेष न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल.

नसरापूर प्रकरणात भीमराव कांबळेला मरपर्यंत फाशी;  पुण्यातील विशेष न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल.

44
0
नसरापूर प्रकरणात भीमराव कांबळेला मरपर्यंत फाशी;  पुण्यातील विशेष न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल.

पुणे ; २९ जून:पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील नसरापूर येथे साडेतीन वर्षांच्या चिमुरडीवर लैंगिक अत्याचार करून तिची निर्घृण हत्या केल्याप्रकरणी दोषी ठरलेल्या भीमराव प्रभाकर कांबळे याला पुण्यातील शिवाजीनगर येथील विशेष न्यायालयाने मरेपर्यंत फाशीची शिक्षा सुनावली. विशेष न्यायाधीश एस. आर. साळुंके यांनी हा गुन्हा ‘दुर्मिळातील दुर्मिळ’ स्वरूपाचा असल्याचे नमूद करत आरोपी सुधारण्याच्या पलीकडे गेल्याचे स्पष्ट केले.

निकाल देताना न्यायालयाने म्हटले की, पीडित चिमुरडी पूर्णपणे असहाय्य होती. आरोपीने अत्यंत क्रूरपणे तिच्यावर लैंगिक अत्याचार करून हत्या केली. आरोपीचा पूर्वीचाही गुन्हेगारी इतिहास गंभीर असून समाजासाठी तो धोकादायक असल्याचे न्यायालयाने नमूद केले. त्यामुळे वयाचा आधार घेऊन दया दाखवण्याचे कोणतेही कारण नसल्याचे स्पष्ट करण्यात आले.

या प्रकरणात पुणे ग्रामीण पोलिसांनी अवघ्या १६ दिवसांत तपास पूर्ण करून सुमारे १,२०० पानी आरोपपत्र दाखल केले. त्यानंतर जलदगतीने सुनावणी पूर्ण करत अवघ्या ५५ दिवसांत निकाल देण्यात आला. देशातील सर्वात वेगवान न्यायप्रक्रियांपैकी ही एक मानली जात आहे.

निकालावेळी पीडित चिमुरडीचे आई-वडील, आजी आणि नातेवाईक न्यायालयात उपस्थित होते. मृत्युदंडाची शिक्षा जाहीर होताच न्यायालयात भावनिक वातावरण निर्माण झाले. न्यायालयाने तपास करणारे पोलीस अधिकारी, सरकारी वकील, फॉरेन्सिक तज्ज्ञ आणि वैद्यकीय पथकाच्या कार्याचेही कौतुक केले.

कायद्यानुसार, सत्र न्यायालयाने सुनावलेल्या मृत्युदंडाच्या शिक्षेला आता उच्च न्यायालयाची पुष्टी आवश्यक असून त्यानंतर आरोपीला सर्वोच्च न्यायालयात अपील करण्याचा अधिकार राहणार आहे.