Home Breaking News आधुनिक पायाभूत सुविधा प्रकल्पातून विकसित महाराष्ट्राची गरुड झेप!20 प्रकल्पांचा वॉर रूम बैठकीत...

आधुनिक पायाभूत सुविधा प्रकल्पातून विकसित महाराष्ट्राची गरुड झेप!20 प्रकल्पांचा वॉर रूम बैठकीत आढावा.

21
0

आधुनिक पायाभूत सुविधा प्रकल्पातून विकसित महाराष्ट्राची गरुड झेप!20 प्रकल्पांचा वॉर रूम बैठकीत आढावा.

मुंबई : ४ जून ,मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सह्याद्री अतिथीगृह येथून आणि व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे महाराष्ट्रातील मेट्रो, शहरी वाहतूक, पायाभूत सुविधा, पाणीपुरवठा व जलव्यवस्थापन यांसारख्या 20 प्रकल्पांचा वॉर रूम बैठकीत आढावा घेतला.

महाराष्ट्राच्या संपन्नतेसाठी पायाभूत सुविधांच्या निर्मिती प्रकल्पांची कामे गतीने पूर्ण होणे गरजेचे आहे. संबंधित यंत्रणांनी प्रकल्प पूर्णत्वातील अडचणी दूर कराव्यात. कंत्राटदाराला देण्यात आलेल्या कालावधीत प्रकल्प पूर्ण झाला पाहिजे याकडे संबंधित यंत्रणांनी लक्ष द्यावे, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. तसेच विलंबाने काम पूर्ण करणाऱ्या कंत्राटदारांना पुढील कुठलेही नवीन काम संबंधित यंत्रणेने देऊ नये, असे आदेशही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.

कुठल्याही परिस्थितीत पायाभूत सुविधांचे प्रकल्प हा तीन ते साडेतीन वर्षांमध्ये पूर्ण झाला पाहिजे, असे निर्देश मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले. निविदा प्रक्रिया राबवताना त्यामध्ये कंत्राटदाराने मागील प्रकल्प पूर्ण करण्यासाठी लावलेल्या कालावधीच्या निकषाचाही समावेश असावा. कंत्राटदारांनी प्रकल्प पूर्ण करण्यासाठी विलंब केल्यास देशाचे व पर्यायाने राज्याचे नुकसान होते. त्यामुळे कुठल्याही परिस्थितीत प्रकल्पाच्या पूर्णत्वामध्ये होणारा विलंब खपवून घेतला जाणार नाही. प्रकल्पाच्या पूर्णत्वामध्ये अनेक अडचणी असतात. मात्र यंत्रणांनी अडचणींवर मात करीत पुढे वाटचाल केली पाहिजे, असे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.

धारावी झोपडपट्टी पुनर्विकास प्रकल्पाचा आढावा घेताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, धारावीमधील उद्योजकांना ‘स्टेट जीएसटी’मधून सवलत मिळण्याबाबत कार्यवाही करावी. यामुळे धारावीमधील उद्योगांना बळ मिळेल. तेथील ‘इन्फॉर्मल इकोनॉमी’ ही ‘फॉर्मल’ होईल. धारावी पुनर्विकासासंदर्भात निविदा प्रक्रियेत असलेल्या विषयांबाबत पुन्हा मंत्रिमंडळासमोर येण्याची आवश्यकता नाही, याबाबत यंत्रणेने संबंधित विभागांशी चर्चा करून समन्वयाने मुद्दे सोडवावेत. ना.म जोशी मार्ग, नायगाव, वरळी येथील बीडीडी चाळींचा पुनर्विकास करताना तेथील रहिवाशांना भाडे देऊन सध्या राहत असलेली घरे विनाविलंब ताब्यात घेत तिथे पुनर्विकास सुरू करावा.

ठाणे ते बोरीवली दुहेरी बोगदा प्रकल्प हा विहित असलेल्या कालमर्यादेत पूर्ण करण्यात यावा. यामध्ये पुढील तीन-तीन महिन्याचे उद्दिष्ट ठेवून काम पूर्णत्वास न्यावे. गोरेगाव ते मुलुंड दुहेरी बोगदा प्रकल्प जानेवारी 2029 पर्यंत पूर्ण करण्यात यावा. त्यामुळे पश्चिम आणि पूर्व उपनगरांमधील दळणवळण सोयीचे होणार आहे. वांद्रे ते वर्सोवा सागरी सेतू मार्गाच्या कामांमध्ये प्रगती करावी. हा अत्यंत महत्त्वपूर्ण प्रकल्प असून यामधील अडचणी सोडविण्यात याव्यात. पायाभूत सुविधा निर्मिती प्रकल्पांच्या पूर्णत्वासाठी इंधनाचा पुरवठा सुरळीत राहण्याबाबत दक्षता घ्यावी, असे निर्देश मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी दिले.

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, विरार ते अलिबाग या मल्टी मॉडेल कॉरिडोरच्या प्रगतीसाठी भूसंपादनाची प्रक्रिया गतिमान करावी. या मार्गाच्या निर्मितीनंतर आजूबाजूच्या जमिनीचे मूल्य वाढणार आहे. याबाबत संबंधित यंत्रणेने विचार करून या वाढणाऱ्या मूल्याचा शासनाच्या माध्यमातून कशा पद्धतीने उपयोग करता येईल, याबाबत नियोजन करावे. या मार्गाच्या आजूबाजूला काही क्षेत्र निश्चित करून त्या ठिकाणी शासनाने जमिनीची उपलब्धता करून देत गुंतवणूकदाराकडून त्या क्षेत्रावर विशिष्ट उद्योगाच्या विकासाबाबत पडताळणी करावी.

पुणे वर्तुळाकार मार्गाचे काम गतीने पूर्ण करावे. मुळा व मुठा नदी पुनरुज्जीवन प्रकल्पासाठी जमीन उपलब्ध करून द्यावी. पुण्यामध्ये मेट्रोचे जाळे विस्तारत आहे. यासाठी एकीकृत तिकीट व्यवस्था असावी. छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका व पाणीपुरवठा विभागाने समन्वयाने काम करावे. यामधील अडचणी दूर करत छत्रपती संभाजीनगर वासियांना मुबलक पाणीपुरवठा करावा, असे निर्देश मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले.

आढावा घेतलेले प्रकल्प :-
✅मेट्रो लाईन 2 ब (डी एन नगर ते मंडाले),
✅मेट्रो लाईन 2 (कासारवडवली ते वडाळा),
✅मेट्रो लाईन 5 (ठाणे – भिवंडी- कल्याण),
✅मेट्रो लाईन 6 (स्वामी समर्थ नगर ते विक्रोळी),
✅मेट्रो लाईन 7 अ (अंधेरी पूर्व ते छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ),
✅मेट्रो लाईन 9 (दहिसर पूर्व ते मीरा-भाईंदर),
✅शिवडी ते वरळी उन्नत मार्ग,
✅पुणे शहरातील पिंपरी चिंचवड महानगरपालिका ते निगडी टप्पा 1 मेट्रो लाईन ,
✅छत्रपती संभाजीनगर शहर पाणीपुरवठा योजना,
✅पुणे शहरातील मान – हिंजवडी – शिवाजीनगर मेट्रो लाईन 3,
✅मुळा व मुठा नदी पुनरुज्जीवन प्रकल्प,
✅पुणे वर्तुळाकार मार्ग,
✅विरार ते अलिबाग मल्टीमॉडल कॉरिडॉर,
✅वांद्रे-वर्सोवा सागरी सेतू मार्ग,
✅गोरेगाव ते मुलुंड जोड रस्ता प्रकल्प,
✅ठाणे ते बोरिवली दुहेरी बोगदा प्रकल्प,
✅ना.म जोशी मार्ग, वरळी व नायगाव येथील बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्प,
✅धारावी पुनर्विकास प्रकल्प.

याप्रसंगी संबंधित विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.