ॲग्री हॅकॅथॉन’च्या माध्यमातून कृषी तंत्रज्ञानाचे केंद्र म्हणून पुण्याची ओळख- उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार

‘आंतरराष्ट्रीय महिला शेतकरी वर्ष’ आयोजित कार्यक्रमात महिला शेतकऱ्यांना सहभागी होण्याचे आवाहन
दुसऱ्या ‘पुणे ॲग्री हॅकेथॉन’चे उपमख्यंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन
पुणे, दि. 15: गतवर्षी जून महिन्यामध्ये आयोजित पुणे ॲग्री हॅकॅथॉनातील 16 नाविण्यपूर्ण उत्पादनांपैकी निवडलेल्या 4 उत्पादनांना कृषी यांत्रिकीकरण योजनेत समाविष्ट करण्याची कार्यवाही राज्य शासनामार्फत सुरु आहे. या वर्षी विविध राज्यातील सुमारे 1 हजार 300 स्पर्धकांनी आपल्या नवकल्पना सादर केल्या असून यामध्ये महाराष्ट्र राज्यातून 867 स्पर्धकांनी भाग घेतला आहे. यामुळे अॅग्री हॅकॅथॉनच्या यशस्वी आयोजनातून पुणे हे विद्येच्या माहेरघरासोबतच कृषी तंत्रज्ञानाचे केंद्र म्हणून ओळखले जात आहे, असे प्रतिपादन राज्याच्या उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी केले. संयुक्त राष्ट्रांने यंदाचे ‘आंतरराष्ट्रीय महिला शेतकरी वर्ष’ म्हणून घोषित केले असून या पार्श्वभुमीवर राज्यामध्ये विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत. या उपक्रमामध्ये अधिकाधिक महिला शेतकऱ्यांनी सहभाग घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.
कृषी विभागाच्यावतीने कृषी महाविद्यालयाच्या सिंचननगर येथील दुसऱ्या पुणे ॲग्री हॅकॅथॉन-२०२६ च्या उद्घाटन प्रसंगी त्या बोलत होत्या. यावेळी महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरीचे कुलगुरु डॉ. विलास खर्चे, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. इंद्रमणी, जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी, ग्रीनरोड इनोवेशन इस्रायलचे अध्यक्ष शफरीर गोडेल, जुरी कमिटी सह अध्यक्ष प्रा.डॉ. के. ई. लवांडे, डॉ. राजाराम देशमुख, सुपर जुरी तथा महाराष्ट्र कृषी तंत्रज्ञ संस्थेचे कार्यकारी अध्यक्ष डॉ. उमाकांत दांगट आदी उपस्थित होते.
श्रीमती पवार म्हणाल्या, महाराष्ट्र हे कृषी क्षेत्रात देशात आघाडीवर असलेलं राज्य असून ऊस, साखर, भाजीपाला उत्पादन आणि फलोत्पादनात तसेच कृषी निर्यातीतदेखील अग्रेसर आहे. कृषी क्षेत्रासाठी ‘कृत्रीम बुद्धीमत्ता धोरण’ (एआय पॉलिसी) जाहीर करणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य आहे. दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी एआय पॉलिसीकरीता सन 2025 च्या अर्थसंकल्पात यासाठी 500 कोटी रुपयांची तरतूद करुन ठेवली होती. तसेच त्यांच्या प्रयत्नामुळेच बारामती येथे आंतरराष्ट्रीय दर्जाचे कृत्रीम बुद्धीमत्ता केंद्र उभारण्यात आले आहे.
त्या पुढे म्हणाल्या, राज्य शासनाने कृत्रिम बुद्धीमत्तेबरोबरच कृषी क्षेत्रात भांडवली गुंतवणूक वाढवण्यासाठी कृषी समृध्दी योजना जाहीर केली. त्यासाठी अर्थसंकल्पात 2 हजार कोटी रुपयांची तरतुद केली आहे. यावर्षीच्या खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांना खतांची अडचण येणार नाही याची काळजी घेतली जात आहे. हवामान विभागाने दिलेल्या प्राथमिक अंदाजानुसार यावर्षी पाऊस कमी झाल्यास उद्भवणाऱ्या परिस्थितीत आवश्यक त्या सर्व उपाययोजना करण्यात येतील.
दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या संकल्पनेतून पुणे ॲग्री हॅकॅथॉनचे आयोजन
हॅकॅथॉन ही संकल्पना प्रामुख्यानं माहिती व तंत्रज्ञान आणि वित्तीय क्षेत्रात वापरली जात होती, कृषी क्षेत्रातील विविध नवनवीन उपाययोजना पुढे येवून कृषी विकासात त्याचा फायदा होईल, याच धर्तीवर दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या संकल्पनेतून अॅग्री हॅकॅथॉनचे आयोजन करण्याची संकल्पना पुढे आली. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही या संकल्पनेला भक्कम पाठिंबा दिला. गतवर्षी जून महिन्यामध्ये पुणे अॅग्री हॅकॅथॉने प्रथमच आयोजन करण्यात आले आणि ते यशस्वी देखील झाले. या हॅकॅथॉनमध्ये 16 नाविण्यपूर्ण उत्पादनांची निवड करण्यात आली आणि विजेत्यांना मोठी पारितोषिकंही देण्यात आली. आजच्या घडीला 16 पैकी 12 उत्पादनांना कृषी विद्यापिठांचे प्रमाणिकरण प्राप्त झाले आहे. यशस्वी नवतंत्रज्ञांन कृषी विद्यापीठ, कृषी विज्ञान केंद्र, बॉम्बे चेंबर ऑफ कॉमर्स, मराठा चेंबर ऑफ कॉमर्स यासारख्या संस्था सहकार्य करीत आहेत. निवडलेल्या उत्पादनांपैकी 4 उत्पादनांना कृषी, यांत्रिकीकरणयोजनेत समाविष्ट करण्याची कार्यवाही सुरु आहे.
यंदाच्या ॲग्री हॅकॅथॉनमध्ये महाराष्ट्र राज्यातील 867 स्पर्धक सहभागी
यावर्षीच्या हॅकॅथॉन स्पर्धेसाठी 9 विषयांचा समावेश आहे. यावर्षी विविध राज्यातील सुमारे 1 हजार 300 स्पर्धकांनी आपल्या नवकल्पना सादर केल्या असून महाराष्ट्र राज्यातून ८६७ स्पर्धकांनी भाग घेतला आहे. सलग दुसऱ्या वर्षी या पुणे ॲग्री हॅकॅथॉनचं यशस्वी आयोजन केल्याबद्दल राज्याचा कृषी विभाग, जिल्हा प्रशासनाच्या संपूर्ण चमूचे अभिनंदन केले. हॅकॅथॉनमध्ये सहभागी उत्पादन, संशोधन, प्रयोग या शेतकऱ्यांकरिता उपयुक्त असून याचा अधिकाधिक शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन श्रीमती पवार यांनी केले.
कृषी क्षेत्रात अडीअडचणीवर मात करण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञान व नवकल्पनांचा वापर करण्याचे आवाहन
बदलत्या काळानुरुप शेतकऱ्यांसमोर अनियमित पाऊस, पाण्याची टंचाई, मातीची निकृष्ठता, बाजारपेठेतील अस्थिरता, हवामान बदल आणि वाढता उत्पादन खर्च यासारखी विविध आव्हाने आहेत. या आव्हानांना सामोरे जाण्याकरिता कृषी क्षेत्रात आधुनिक तंत्रज्ञानाची जोड, नवकल्पना आणि युवकांच्या उर्जेचा योग्य वापर खरा उपाय ठरेल. ॲग्री हॅकॅथॉन मध्ये सहभागी युवक, अभियंते, डेटा साइंटिस्ट, कृषी अभ्यासक्रमाचे विद्यार्थी आणि स्टार्टअप उद्योजक कृषी क्षेत्रातील समस्या सोडवण्यासाठी आपली बुध्दिमत्ता आणि सर्जनशीलता वापरतील. आपल्या उपायोजना, नवकल्पना शेतकऱ्यांच्या शेतात, मोबाईल अॅपमध्ये, ड्रोनमध्ये, सेन्सर्समध्ये आणि एआय आधारित प्लॅटफॉर्ममध्ये प्रत्यक्षात वापरले जातील. कृषी विभागानं या हॅकॅथॉनसाठी जे प्लॅटफॉर्म उपलब्ध करुन दिले आहेत, त्याबद्दल कृषी विभागाचे आणि सर्व आयोजकांचे अभिनंदन करुन त्या म्हणाल्या, आपल्या सर्वांच्या प्रयत्नांनी महाराष्ट्र हे कृषी नवकल्पांचे केंद्र बनेल, असा विश्वास श्रीमती पवार यांनी व्यक्त केला.