Home Breaking News पुणे दौऱ्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ‘बुधभूषण’ शिल्पाचे अनावरण; ₹१२९० कोटींच्या...

पुणे दौऱ्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ‘बुधभूषण’ शिल्पाचे अनावरण; ₹१२९० कोटींच्या विकासकामांना मंजुरी.

42
0

पुणे दौऱ्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ‘बुधभूषण’ शिल्पाचे अनावरण; ₹१२९० कोटींच्या विकासकामांना मंजुरी.

पुणे दि.१७:पुणे महानगरपालिकेच्या वतीने शिवाजीनगर येथील छत्रपती संभाजी महाराज उद्यानात उभारण्यात आलेल्या ‘बुधभूषण’ ग्रंथ रचनाकार छत्रपती संभाजी महाराज यांच्या भव्य पूर्णाकृती कांस्य शिल्पाचे अनावरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते संपन्न झाले. या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत (दादा) पाटील, आमदार डॉ. नीलम गोऱ्हे, सिद्धार्थ शिरोळे, हेमंत रासने, महापौर मंजुषा नागपुरे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

छत्रपती संभाजी महाराज ‘बुधभूषण’ ग्रंथ रचताना दर्शविणारे हे १० फूट उंचीचे पूर्णाकृती कांस्य शिल्प जगातील पहिले मानले जात असून महाराष्ट्रात प्रथमच पुणे महानगरपालिकेकडून उभारण्यात आले आहे. या प्रकल्पासाठी सुमारे ₹५ कोटी खर्च करण्यात आले आहेत.

या ठिकाणी ‘बुधभूषण’ ग्रंथातील निवडक ९ श्लोक मराठी आणि इंग्रजी अर्थासह दगडी भिंतींवर कोरण्यात आले असून, इतिहास तज्ज्ञ आणि संस्कृत अभ्यासकांच्या समितीमार्फत त्यांची निवड करण्यात आली आहे. परिसरात रंगीत कारंजे, आकर्षक फुलझाडे आणि विद्युत रोषणाईमुळे या ठिकाणाच्या सौंदर्यात भर पडली आहे.

अत्यंत कठीण काळात हिंदवी स्वराज्याची धुरा सांभाळणाऱ्या छत्रपती संभाजी महाराजांचे संस्कृत भाषेवरील प्रभुत्व आणि विद्वत्ता जगासमोर आणण्यासाठी हे शिल्प प्रेरणादायी ठरणार असल्याचे मत व्यक्त करण्यात आले.

मुख्यमंत्री फडणवीस यांच्या पुणे दौऱ्यात बाणेर येथील कर्करोग रुग्णालय, समान पाणीपुरवठा योजनेंतर्गत पाण्याच्या टाक्या यांचे लोकार्पण करण्यात आले. तसेच ‘अर्बन चॅलेंज फंड’ अंतर्गत पुण्यातील १२ गावांच्या पाणीपुरवठा आणि पूर नियंत्रण प्रकल्पांसाठी सुमारे ₹१२९० कोटींच्या विकासकामांना मंजुरी देण्यात आली.

याशिवाय कृषी महाविद्यालयातील ‘कृषी नवोन्मेष आणि उष्मायन केंद्र’ प्रकल्पाचे भूमिपूजन आणि हॅकेथॉन स्पर्धेच्या समारोप कार्यक्रमालाही मुख्यमंत्री उपस्थित राहिले.

दरम्यान, या दौऱ्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते पार्थ पवार यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेतल्याने राजकीय चर्चांना उधाण आले होते. मात्र, “आम्ही मित्रपक्ष असून ही एक सामान्य भेट होती. त्यामध्ये प्रशासकीय आणि राजकीय विषयांवर चर्चा झाली,” असे स्पष्टीकरण मुख्यमंत्र्यांनी दिले.