Home Breaking News नवतपाच्या सूर्यज्वाळांनी विदर्भ होरपळला!

नवतपाच्या सूर्यज्वाळांनी विदर्भ होरपळला!

31
0

नवतपाच्या सूर्यज्वाळांनी विदर्भ होरपळला! ब्रह्मपुरी ४७.६° वर; नागपूरसह सहा शहरांचा पारा ४६ अंशांच्या पुढे.

विदर्भ : विदर्भात नवतपाच्या सुरुवातीलाच उष्णतेने कहर केला असून संपूर्ण प्रदेश जणू भट्टीसारखा तापला आहे. सलग काही दिवसांपासून आग ओकणाऱ्या सूर्यामुळे नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरी येथे सोमवारी तब्बल ४७.६ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली असून हे शहर सलग दुसऱ्या दिवशी देशातील सर्वाधिक उष्ण शहर ठरले आहे.

तर नागपूर शहराचा पारा १.१ अंशांनी वाढून थेट ४६.६ अंशांवर पोहोचला आहे. याशिवाय भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर आणि वर्धा या जिल्ह्यांतील तापमानही ४६ अंशांच्या पुढे गेले आहे. उष्ण लाटांमुळे नागरिक अक्षरशः भाजून निघत असून दुपारच्या वेळेत रस्ते ओस पडल्याचे चित्र दिसत आहे.

विदर्भातील तापमानाने गाठला उच्चांक

गेल्या आठवडाभरापासून विदर्भात प्रखर उन्हाचा तडाखा सुरू आहे. अकरापैकी नऊ जिल्ह्यांमध्ये तापमान ४५ अंशांच्या वर नोंदवले गेले आहे. विशेष म्हणजे, सरासरीपेक्षा तब्बल ५ अंशांनी अधिक तापमान ब्रह्मपुरी येथे नोंदविण्यात आले आहे.

प्रमुख शहरांतील कमाल तापमान

ब्रह्मपुरी – ४७.६°

नागपूर – ४६.६°

भंडारा – ४६.४°

गडचिरोली – ४६.४°

गोंदिया – ४६.१°

चंद्रपूर – ४६°

वर्धा – ४६°

अकोला – ४५.४°

अमरावती – ४५°

यवतमाळ – ४४.४°

मान्सून पुढे सरकत असला तरी विदर्भात उष्णतेचा कहर

एकीकडे नैऋत्य मान्सून वेगाने पुढे सरकत असून पुढील तीन-चार दिवसांत अरबी समुद्र परिसरात सक्रिय होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. मात्र दुसरीकडे विदर्भातील उष्णतेचा कहर अद्याप कायम आहे. दिवसासोबत रात्रीदेखील उकाड्याने नागरिक हैराण झाले आहेत.

काही जिल्ह्यांत पावसाची शक्यता

हवामान विभागाच्या अंदाजानुसार वर्धा, चंद्रपूर, अकोला, अमरावती आणि यवतमाळ जिल्ह्यांत ढगाळ वातावरणासह वादळी वाऱ्यांसह हलक्या पावसाची शक्यता आहे.

तसेच २८ मेपासून विदर्भातील अनेक भागांत हलक्या पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला असून त्यामुळे तापमानात २ ते ४ अंशांनी घट होऊन नागरिकांना काहीसा दिलासा मिळू शकतो.

पुढील तीन दिवस ‘तीव्र उष्ण लाट’ इशारा

हवामान विभागाने २८ मेपर्यंत विदर्भातील अनेक जिल्ह्यांसाठी तीव्र उष्ण लाटेचा इशारा जारी केला आहे. नागपूर, भंडारा, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया आणि अकोला येथे उष्णतेची तीव्रता कायम राहण्याची शक्यता आहे. तर यवतमाळमध्ये २६ मेपर्यंत आणि अमरावतीमध्ये २८ मे रोजी उष्ण लाटेचा प्रभाव कायम राहणार असल्याचे सांगण्यात आले आहे.