Pune:उपराष्ट्रपती राधाकृष्णन यांच्या उपस्थितीत निसर्गोपचार आश्रमाचा ८१ व्या स्थापना दिवस समारंभ संपन्न.

पुणे, दि. २२: महात्मा गांधीजींनी स्थापन केलेल्या निसर्गोपचार आश्रमाने केवळ व्यक्तींना शारीरिक-मानसिक आरोग्यच प्रदान केले नाही, तर ग्रामीण विकासातही मोलाचे योगदान दिले आहे. ग्रामीण लोकांशी संस्थेने जोडून घेतलेले नाते आणि त्यांना शाश्वतता व स्वावलंबनाचे धडे देण्यासाठी देण्यात येत असलेले प्रशिक्षण अत्यंत प्रशंसनीय आहे, असे प्रतिपादन उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन यांनी केले.
उरुळी कांचन (ता. हवेली) येथील निसर्गोपचार आश्रमाच्या ८१ व्या स्थापना दिवस कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी राज्यपाल जिष्णू देव वर्मा, राज्यसभेचे उपसभापती हरिवंश नारायण सिंह, राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, आमदार माऊली उर्फ ज्ञानेश्वर कटके, आश्रमाचे व्यवस्थापकीय विश्वस्त डॉ. नारायण हेगडे, वैद्यकीय संचालक आणि विश्वस्त सचिव डॉ. अभिषेक देवीकर, श्री संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान आळंदीचे मुख्य विश्वस्त डॉ. भावार्थ देखणे उपस्थित होते.
उपराष्ट्रपती म्हणाले, उरुळी कांचन या गावात महात्मा गांधीजींनी मणिभाई देसाई, बाळकोबा भावे, श्रीमती गंगाबेन भाटे आणि इतर सहकाऱ्यांच्या मदतीने १९४६ या वर्षी या आश्रमाची स्थापना केली. ही संस्था आता जागतिक स्तरावर सन्मानित होणाऱ्या एका केंद्रात रूपांतरित झाली आहे. या आश्रमाद्वारे मानवतेसाठी दिल्या जाणाऱ्या महान सेवेमुळे आज हे छोटेसे गाव संपूर्ण जगात ओळखले जाते. ‘निसर्गोपचार आश्रम’ ही एक चळवळ आहे, एक तत्त्वज्ञान आहे आणि गांधीजींच्या कालातीत दृष्टिकोनातून प्रेरित झालेली एक जीवनपद्धती आहे. निसर्ग हाच सर्वश्रेष्ठ उपचारक आहे, असा गांधीजींचा दृढ विश्वास होता.
राज्यपाल श्री. वर्मा म्हणाले, महात्मा गांधी हे निसर्गोपचाराचे महान पुरस्कर्ते होते. स्वातंत्र्याच्या वर्षी ३३ कोटी लोकसंख्येवरून आपण १४० कोटी लोकसंख्या गाठली असून आयुर्मयादा दुप्पट झाली आहे.
उपमुख्यमंत्री श्रीमती पवार म्हणाल्या, निसर्गोपचार आश्रम केवळ एक आरोग्य केंद्र नसून जीवन जगण्याचा महत्वपूर्ण मार्ग आहे.डॉ. हेगडे यांनी प्रास्ताविकात आश्रमाची माहिती दिली. ते म्हणाले, राष्ट्रपिता महात्मा गांधी हे याच दिवशी १९४६ येथे आले आणि सहकाऱ्यांच्या मदतीने निसर्गोपचार आश्रम स्थापन केला व स्थानिकांवर निसर्गोपचार केले.यावेळी श्री संत ज्ञानेश्वर महाराज संस्थानचे विश्वस्त डॉ. देखणे यांनीही मनोगत व्यक्त केले.
यावेळी डॉ. हेगडे लिखित ‘आमच्या आनंदाचे रहस्य’ अर्थात ‘सिक्रेट्स ऑफ आवर हॅपीनेस’ या पुस्तकाचेही यावेळी प्रकाशन करण्यात आले.