Home Breaking News उल्हासनगर महापालिका निवडणुकीत महायुतीचा जोरदार प्रचार; गोल मैदानात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची...

उल्हासनगर महापालिका निवडणुकीत महायुतीचा जोरदार प्रचार; गोल मैदानात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भव्य जाहीर सभा आज

24
0
उल्हासनगर :- उल्हासनगर महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहराच्या राजकारणात आज मोठी हालचाल पाहायला मिळणार आहे. शिवसेना – टीम ओमी कलानी – साई पक्ष या युतीच्या अधिकृत उमेदवारांच्या प्रचारार्थ आज गोल मैदान येथे राज्याचे उपमुख्यमंत्री तथा शिवसेना नेते मा. ना. श्री. एकनाथजी शिंदे साहेब यांची भव्य जाहीर सभा आयोजित करण्यात आली आहे. या सभेला नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.
या जाहीर सभेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे शहरातील विकासकामांचा आढावा घेत, आगामी काळात उल्हासनगरच्या सर्वांगीण विकासासाठी राबविण्यात येणाऱ्या योजनांची माहिती देणार आहेत. रस्ते, पाणीपुरवठा, ड्रेनेज, आरोग्य सेवा, शिक्षण, रोजगार, स्वच्छता आणि नागरी सुविधा यांसह मूलभूत प्रश्नांवर ठोस उपाययोजना राबवण्याचा निर्धार या वेळी व्यक्त केला जाणार आहे.
शिवसेना – टीम ओमी कलानी – साई पक्ष युतीच्या माध्यमातून उल्हासनगर महापालिकेत स्थिर, सक्षम आणि विकासाभिमुख प्रशासन देण्याचा संकल्प करण्यात आला असून, स्थानिक नेतृत्वाला बळ देत सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नांना प्राधान्य देण्याचे आश्वासन देण्यात येणार आहे. या सभेमुळे युतीच्या प्रचाराला नवे बळ मिळेल, असा विश्वास कार्यकर्त्यांनी व्यक्त केला आहे.
उल्हासनगरच्या विकासासाठी राज्य सरकारची संपूर्ण ताकद शहराच्या पाठीशी उभी राहील, असा संदेश या सभेतून दिला जाणार असून, महापालिका निवडणुकीत युतीच्या उमेदवारांना मोठ्या मताधिक्याने विजयी करण्यासाठी नागरिकांनी सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.