नवी दिल्ली : २०२६ साठी भारताने सामरिक पातळीवर कंबर कसली असून बंगालच्या उपसागरापासून हिंद महासागर आणि अरबी समुद्रापर्यंत सागरी सुरक्षेची व्याप्ती अधिक मजबूत करण्यात येत आहे. याच पार्श्वभूमीवर भारत जगातील सर्वात मोठ्या बहुराष्ट्रीय नौदल सरावांपैकी एक असलेल्या ‘मिलन-2026 (MILAN-26)’ या भव्य युद्धाभ्यासाचे आयोजन करणार आहे. हा युद्धाभ्यास आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणम येथे होणार असून, यात अमेरिका, रशिया यांच्यासह अनेक बलाढ्य राष्ट्रांच्या नौसेना सहभागी होणार आहेत.
या सरावासाठी अमेरिका आणि रशियाच्या प्रगत युद्धनौका भारताच्या दिशेने रवाना होणार असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे आंतरराष्ट्रीय सामरिक वर्तुळात मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे. या युद्धाभ्यासाच्या माध्यमातून भारत आपली सागरी ताकद, तांत्रिक क्षमता आणि आंतरराष्ट्रीय सहकार्य अधिक ठळकपणे जगासमोर मांडणार आहे.
‘मिलन-2026’ हा केवळ युद्धसराव नसून भारताच्या ‘महासागर (MAHASAGAR)’ व्हिजनचा महत्त्वाचा भाग आहे. या व्हिजनच्या माध्यमातून भारत स्वतःला हिंद महासागर क्षेत्रातील नेतृत्व करणारी शक्ती म्हणून प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करत आहे. सामूहिक सागरी सुरक्षा, दहशतवादविरोधी कारवाया, समुद्री व्यापार मार्गांचे संरक्षण आणि आपत्ती व्यवस्थापन यावर या सरावात विशेष भर दिला जाणार आहे.
विशाखापट्टणम येथे होणाऱ्या या युद्धाभ्यासात युद्धनौका, पाणबुड्या, लढाऊ विमाने, हेलिकॉप्टर्स आणि आधुनिक ड्रोन तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येणार आहे. सहभागी देशांमध्ये संयुक्त युद्धसराव, रणनीतीची देवाणघेवाण, शोध-बचाव मोहिमा आणि सागरी गस्त यांचा समावेश असेल.
संरक्षण तज्ज्ञांच्या मते, बदलत्या जागतिक राजकीय परिस्थितीत भारताचा हा युद्धाभ्यास रणनीतिक संदेश देणारा ठरणार आहे. विशेषतः हिंद महासागरातील चीनची वाढती उपस्थिती, सागरी व्यापार मार्गांवरील धोके आणि प्रादेशिक अस्थिरता लक्षात घेता, भारताचे हे पाऊल अत्यंत महत्त्वाचे मानले जात आहे.
भारताच्या नेतृत्वाखाली होणारा ‘मिलन-2026’ युद्धाभ्यास जागतिक नौदल सहकार्याचा नवा अध्याय ठरेल, तसेच भारताची सागरी महासत्ता म्हणून ओळख अधिक भक्कम होईल, असा विश्वास संरक्षण क्षेत्रातील जाणकारांनी व्यक्त केला आहे.