Home Breaking News बुधवार पेठेत बनावट Apple अ‍ॅक्सेसरीज विक्रीचा पर्दाफाश; ६ दुकानदारांवर गुन्हे दाखल, ₹10.39...

बुधवार पेठेत बनावट Apple अ‍ॅक्सेसरीज विक्रीचा पर्दाफाश; ६ दुकानदारांवर गुन्हे दाखल, ₹10.39 लाखांचा मुद्देमाल जप्त

88
0
पुणे | प्रतिनिधी — पुणे शहरातील बुधवार पेठ परिसरात बनावट Apple मोबाइल अ‍ॅक्सेसरीज विक्रीचा मोठा प्रकार उघडकीस आला असून, पुणे पोलिसांनी सहा दुकानदारांविरोधात गुन्हे दाखल केले आहेत. टपकीर गल्ली परिसरातील विविध दुकानांवर एकाच वेळी छापे टाकून Apple कंपनीच्या नावाने विक्री केली जाणारी बनावट उत्पादने जप्त करण्यात आली आहेत. या कारवाईत तब्बल ₹10.39 लाख रुपये किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे.
ही तक्रार फरासखाना पोलीस ठाण्यात विजय यशवंत सागेलकर (वय ५०, रा. बांद्रा, मुंबई) यांनी दाखल केली आहे. सागेलकर हे Apple Inc. चे अधिकृत प्रतिनिधी असून, बनावट Apple उत्पादने ओळखणे, त्यांच्यावर कारवाई करणे आणि कायदेशीर प्रक्रिया राबवण्याची जबाबदारी त्यांच्याकडे आहे. त्यांना कंपनीकडून विशेष प्रशिक्षण देण्यात आले असून, हुबेहूब दिसणाऱ्या बनावट अ‍ॅक्सेसरीज ओळखण्यात ते तज्ज्ञ आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, समर्थ प्लाझा इमारत आणि अ‍ॅडॉर्न बिझनेस सेंटर येथे बनावट Apple मोबाइल अ‍ॅक्सेसरीज मोठ्या प्रमाणात विकल्या जात असल्याची माहिती मिळाल्यानंतर संयुक्त पोलिस पथकाने एकाच वेळी अनेक ठिकाणी छापे टाकले. ही कारवाई पोलीस उपनिरीक्षक जाधव यांच्या नेतृत्वाखाली, उपायुक्त पोलीस हृषिकेश रावळे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. फरासखाना पोलीस ठाण्याचे PSI संतोष गोरे या प्रकरणाचा तपास करत आहेत.
या प्रकरणात अटक/गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपींची नावे
कसनाराम घिगाजी चौधरी (२५), मुकेश पुरीकरण पुरीगोस्वामी (२९), मनीष करमीराम चौधरी (३७), जोगसिंग रूपसिंग राजपूत (३५), हितेशकुमार मघाराम पुरोहित (२५) आणि राजेशचंद्र कृष्णचंद्र गोयल (६०) अशी असून, हे सर्व पुणे शहरातील विविध भागातील रहिवासी आहेत.
छाप्यांदरम्यान पोलिसांनी बनावट iPhone बॅटऱ्या, Apple लोगो असलेले बॅक पॅनल्स, USB पॉवर अ‍ॅडॅप्टर, USB केबल्स, इअरपॉड्स, हेडफोन्स, MagSafe पॉवर अ‍ॅडॅप्टर आणि मोबाईल कव्हर्स जप्त केले आहेत. ही कारवाई प्रेम टेलिकॉम, राज टेलिकॉम शॉप, ओम राजेश्वर शॉप, राज सेल्स, हिरा मोबाईल स्पेअर्स आणि गोयल मोबाईल या दुकानांवर करण्यात आली.
एकूण ₹10,39,700 रुपये किमतीचा बनावट माल जप्त करण्यात आला असून, या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे. पोलिसांनी नागरिकांना स्वस्ताच्या आमिषाला बळी न पडता अधिकृत विक्रेत्यांकडूनच इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदी करण्याचे आवाहन केले आहे. बनावट अ‍ॅक्सेसरीजमुळे ग्राहकांची आर्थिक फसवणूक तर होतेच, शिवाय मोबाईल सुरक्षिततेलाही धोका निर्माण होऊ शकतो, असेही पोलिसांनी नमूद केले आहे.