Home Breaking News कात्रज दत्तनगर रस्त्यावर जीवघेणी गळती – PMC प्रशासन झोपेत!

कात्रज दत्तनगर रस्त्यावर जीवघेणी गळती – PMC प्रशासन झोपेत!

114
0
पुणे | ४ ऑक्टोबर २०२५ – कात्रज दत्तनगर मुख्य रस्त्यावर जैन मंदिराकडे जाणाऱ्या मार्गावर प्रचंड खड्डे आणि सततच्या पाण्याच्या गळतीमुळे नागरिकांचे हाल होत आहेत. या ठिकाणी असलेल्या पाण्याच्या वाल्वमधून दररोज लाखो लिटर पाणी वाया जात असून रस्ता कायम पाण्याखाली राहतो. परिणामी, अपघात, वाहतूक कोंडी आणि नागरिकांच्या सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.
रस्ता खोल चढ-उताराचा असल्यामुळे दुचाकीस्वार घसरून गंभीर जखमी होत आहेत. गेल्या दोन महिन्यांपासून नागरिकांनी सतत तक्रारी दिल्या तरीही PMC प्रशासनाने कोणतीही ठोस उपाययोजना केलेली नाही. पाणीपुरवठा विभाग व पथविभाग मात्र एकमेकांवर जबाबदारी ढकलत आहेत आणि नागरिक मात्र रोज धोक्याचा प्रवास करीत आहेत.

राजकीय निष्क्रियता आणि विश्वासघात
मागील चार वर्षांपासून पुणे महापालिकेच्या निवडणुका झालेल्या नाहीत. त्यामुळे स्थानिक प्रतिनिधी नसल्याने नागरिक पूर्णपणे बेसहारा झाले आहेत. माजी नगरसेवक शांत आहेत, तर या भागाचे आमदार आणि खासदार नागरिकांच्या समस्या सोडवण्याऐवजी फक्त राजकारणात व्यस्त असल्याचा आरोप नागरिक करत आहेत.
आपचे शहराध्यक्ष प्रशांत कांबळे (सामाजिक न्याय विभाग) यांनी प्रशासनाला धारेवर धरत सांगितले –
“तातडीने गळती बंद करावी, जबाबदार अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करावी आणि रस्त्यावरील खड्डे त्वरित बुजवावेत. जनतेशी विश्वासघात करणाऱ्या आमदार-खासदारांनी स्पष्ट भूमिका मांडावी. सुरक्षित व स्वच्छ रस्ता मिळावा ही प्रशासनाची थेट जबाबदारी आहे.”
त्यांनी स्पष्ट इशारा दिला की, जर PMC प्रशासनाने तात्काळ कारवाई केली नाही, तर आम आदमी पार्टी नागरिकांसह रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन उभारेल.
ठळक मुद्दे :
  • दररोज लाखो लिटर पाणी वाया – PMC प्रशासन निष्क्रिय
  • रस्त्यावर प्रचंड खड्डे – अपघातांची मालिका सुरू
  • नागरिकांच्या तक्रारींना दोन महिने दुर्लक्ष
  • आमदार-खासदारांकडून पूर्ण बेफिकिरी
  • आपचा इशारा – तातडीने कारवाई न झाल्यास आंदोलन
कात्रज दत्तनगर रस्त्यावरील पाण्याची गळती आणि खड्ड्यांमुळे नागरिकांचा जीव धोक्यात आला आहे. निवडून आलेल्या प्रतिनिधींचा अभाव, प्रशासनाची ढिलाई आणि राजकीय निष्क्रियता यामुळे जनतेचा विश्वास ढासळत आहे. आता नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी तातडीने उपाययोजना होणे अत्यावश्यक आहे.