Home Breaking News ‘सतर्क महाराष्ट्र’ न्यूज चॅनलच्या मोबाईल अ‍ॅपचे दिमाखात उद्घाटन; संपादक रेखा भेगडे यांच्या...

‘सतर्क महाराष्ट्र’ न्यूज चॅनलच्या मोबाईल अ‍ॅपचे दिमाखात उद्घाटन; संपादक रेखा भेगडे यांच्या वाढदिवसानिमित्त मान्यवरांची गौरवपूर्ण उपस्थिती

82
0
तळेगाव दाभाडे : मावळसह संपूर्ण पुणे जिल्ह्यात अल्पावधीतच आपले भक्कम स्थान निर्माण करणाऱ्या ‘सतर्क महाराष्ट्र’ न्यूज चॅनलच्या मोबाईल अ‍ॅपचे भव्य उद्घाटन सोहळा इंद्रायणी विद्यामंदिर संस्थेच्या सभागृहात उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. या कार्यक्रमात पत्रकारिता क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या आणि ‘सतर्क महाराष्ट्र’ च्या यशामागील आधारस्तंभ ठरलेल्या संपादक रेखा भेगडे यांच्या वाढदिवसानिमित्त विशेष अभिष्टचिंतन सोहळा आयोजित करण्यात आला होता.
या प्रसंगी विविध क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थित राहून रेखा भेगडे यांना शुभेच्छांचा वर्षाव केला. उद्योजक रामदास काकडे आणि संस्थेचे कार्यवाह चंद्रकांत शेटे यांनी अनुक्रमे २१ हजार रुपयांचा धनादेश तर ज्येष्ठ पत्रकार आणि स्वाभिमानी पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष अमीन खान यांनी ११ हजार रुपयांचा अर्थसहाय्य निधीचा धनादेश सुपूर्त करून या नव्या अ‍ॅपच्या प्रमोशनसाठी हातभार लावला.

मान्यवरांची गौरवपूर्ण भाष्ये
रामदास काकडे यांनी उदघाटन करताना रेखा भेगडे यांच्या पत्रकारितेतील प्रवासाचा आढावा घेत, त्यांची सत्य आणि निःपक्षपाती वृत्तांकनाची भूमिका कौतुकास्पद असल्याचे मत व्यक्त केले. त्यांनी पुढे सांगितले की, “गुणी पत्रकारांना इंद्रायणी संस्थेचे सहकार्य सदैव राहील.”
माजी राज्यमंत्री संजय उर्फ बाळा भेगडे यांनी रेखा भेगडे यांच्या पत्रकारिता आणि सामाजिक कार्याच्या योगदानावर भर देत, त्यांच्या कामगिरीमुळे समाजात वेगळे स्थान निर्माण झाले आहे, असे गौरवोद्गार काढले.
चंद्रकांत शेटे यांनी रेखा भेगडे यांच्या बालपणापासून डिजिटल मीडियापर्यंतच्या प्रवासाच्या आठवणींना उजाळा दिला.
भाजपा किसान मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष गणेश भेगडे म्हणाले की, पत्रकारांनी निःपक्षपाती भूमिका घेऊन दोन्ही बाजूंना स्थान देणे आवश्यक आहे, कारण पत्रकारिता ही समाजाचा आरसा आहे.
विशेष उपस्थिती
या सोहळ्याला राष्ट्रवादी काँग्रेस महिला अध्यक्षा प्रिया मोडक, माजी उपसभापती शांताराम कदम, माजी नगरसेवक सचिन टकले, माजी नगराध्यक्ष सुरेश धोत्रे, उद्योजक संग्राम जगताप, तळेगाव प्रेस फाउंडेशनचे संस्थापक विलास भेगडे, कार्याध्यक्ष काकासाहेब काळे, प्राचार्य डॉ. संभाजी मलघे, तसेच राजकीय, पत्रकार, सामाजिक, सांस्कृतिक, क्रीडा, शैक्षणिक आणि धार्मिक क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

युवतीच्या कष्टाला ‘अर्थ’पूर्ण आशीर्वाद
एकाकी संघर्षातून स्वाभिमानी महिला पत्रकार म्हणून स्वतःचे स्थान निर्माण करणाऱ्या रेखा भेगडे यांच्या कष्टाला अर्थपूर्ण आशीर्वाद देण्याच्या हेतूने अमीन खान आणि रामदास काकडे यांनी दिलेले धनादेश हा सोहळ्याचा भावनिक आणि प्रेरणादायी क्षण ठरला. उपस्थित मान्यवर आणि पत्रकारांनी टाळ्यांच्या गजरात या उपक्रमाला दाद दिली.
 आयोजन
कार्यक्रमाचे संयोजन ज्येष्ठ पत्रकार काकासाहेब उर्फ जगन्नाथ काळे यांनी केले.
अमीन खान यांनी प्रास्ताविक, सोमनाथ नाडे यांनी सूत्रसंचालन तर आभार प्रदर्शन स्वतः रेखा भेगडे यांनी मानले.
‘सतर्क महाराष्ट्र’ न्यूज चॅनलने मोबाईल अ‍ॅपच्या माध्यमातून डिजिटल मीडियात मोठी झेप घेतली आहे. यामुळे सत्य, निर्भीड व निःपक्षपाती पत्रकारितेला नवा डिजिटल चेहरा मिळाला असून पुणे जिल्ह्यातील तसेच महाराष्ट्रातील वाचक-प्रेक्षकांना बातम्यांचा द्रुतगती आणि विश्वासार्ह स्रोत उपलब्ध होणार आहे.