Home Breaking News सायबर योद्ध्यांचा जागरूकतेचा लढा! ५० हजार नागरिकांपर्यंत सायबर सुरक्षा संदेश पोहोचवण्यात यश

सायबर योद्ध्यांचा जागरूकतेचा लढा! ५० हजार नागरिकांपर्यंत सायबर सुरक्षा संदेश पोहोचवण्यात यश

95
0
सायबर गुन्हेगारीच्या वाढत्या घटनांना आळा घालण्यासाठी “सायबर वॉरियर्स” नावाने ओळखल्या जाणाऱ्या तरुणांनी एक वेगळाच उपक्रम राबवला आहे. आजवर त्यांनी तब्बल ५० हजार नागरिकांपर्यंत सायबर सुरक्षिततेचा संदेश पोहोचवून त्यांना सावध केले आहे. विशेष म्हणजे मावळ आणि पिंपरी-चिंचवड परिसरात या सायबर योद्ध्यांनी आतापर्यंत ६५ सायबर गुन्ह्यांचे निराकरण करून पीडितांचे लाखो रुपये वाचवले आहेत.
डिजिटल युगात ऑनलाइन फसवणूक, बँकिंग फ्रॉड, फिशिंग, बनावट कॉल्स आणि सोशल मीडियावरील घोटाळे यामध्ये झपाट्याने वाढ होत आहे. या पार्श्वभूमीवर प्रज्ञा कॉलेज ऑफ कॉमर्स अँड कॉम्प्युटर स्टडीज यांनी क्विक हील फाउंडेशनच्या “सायबर शिक्षा फॉर सायबर सुरक्षा” या उपक्रमाच्या माध्यमातून गेली दोन वर्षे व्यापक सायबर जनजागृती मोहीम राबवली आहे.
या मोहिमेअंतर्गत विद्यार्थ्यांनी शाळा, महाविद्यालये, कंपनी कर्मचारी, राजकीय व्यक्ती, कलाकार, सैनिकी शाळा, पोलिस प्रशिक्षण केंद्र, डॉक्टर, नर्स, सरकारी महिला कामगार, अग्निशमन दल, तृतीयपंथी, दिव्यांग विद्यार्थी, वृद्धाश्रमातील नागरिक, बांधकाम कामगार, झोपडपट्टी परिसरातील नागरिक तसेच वारकरी संप्रदायापर्यंत पोहोचून सायबर सुरक्षा मार्गदर्शन केले आहे.
कार्यक्रमात तज्ज्ञांनी पासवर्ड व्यवस्थापन, सोशल मीडियाचा सुरक्षित वापर, फिशिंग व व्हॉट्सअॅप फसवणूक टाळणे, सरकारी व बँक फसवणूक ओळखणे यांसारख्या महत्त्वाच्या विषयांवर सविस्तर मार्गदर्शन केले. फक्त माहितीपुरते नव्हे, तर प्रत्यक्ष उदाहरणे, व्हिडिओ व संवादातून जनतेला जागृत करण्यात आले.
या प्रकल्पाचे समन्वयक हर्षिता वच्चानि, प्रेसिडेंट श्रावणी सावंत, सेक्रेटरी आकाश ठाकूर, अॅक्टिव्हिटी डायरेक्टर ऑलिव वर्गीस, मीडिया डायरेक्टर मानसी वाडेकर यांनी विशेष मेहनत घेतली. तसेच क्विक हील सीएसआर एक्झिक्युटिव्ह अजय शिर्के, गायत्री केसकर व दिपू सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम यशस्वीपणे पार पडत आहे.
सायबर वॉरियर्सच्या या उपक्रमामुळे नागरिकांमध्ये डिजिटल सुरक्षिततेबाबत जागरूकता मोठ्या प्रमाणात वाढली आहे. आजच्या काळात प्रत्येकाने सजग राहून “सायबर सुरक्षित भारत” घडवण्यास हातभार लावावा, हा या मोहिमेचा मुख्य संदेश ठरला आहे.
“सायबर वॉरियर्सची जनजागृती मोहीम : ५० हजार नागरिकांना दिला सायबर सुरक्षिततेचा संदेश, ६५ गुन्ह्यांमध्ये लाखो रुपये वाचवण्यात यश”