Home Breaking News आमदार सुनील शेळके यांच्या उपस्थितीत तळेगाव दाभाडे इंडस्ट्रियल असोसिएशनची महत्त्वपूर्ण बैठक; रस्ते,...

आमदार सुनील शेळके यांच्या उपस्थितीत तळेगाव दाभाडे इंडस्ट्रियल असोसिएशनची महत्त्वपूर्ण बैठक; रस्ते, वाहतूक, वीजपुरवठा व कामगार कल्याणासाठी घेतले ठोस निर्णय

155
0
तळेगाव दाभाडे इंडस्ट्रियल असोसिएशनच्या महत्त्वपूर्ण बैठकीस आमदार सुनील शेळके यांची प्रमुख उपस्थिती लाभली. उद्योग क्षेत्रातील विविध समस्या, कामगारांचे प्रश्न आणि पायाभूत सुविधांच्या उभारणीसंदर्भात या बैठकीत सविस्तर चर्चा झाली. बैठकीत अनेक ठोस निर्णय घेण्यात आले असून या निर्णयांमुळे मावळ तालुक्यातील उद्योग क्षेत्राचा विकास वेगाने होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.
बैठकीदरम्यान आमदार सुनील शेळके यांनी चाकण-शिंदे वसुली मार्ग व शिंदे वसुली पॉवर हाऊस मार्गावरील प्रलंबित रस्त्यांची कामे तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना संबंधित विभागाला दिल्या. रस्त्यांची अपुरी स्थिती व वाहतुकीतील अडचणी लक्षात घेऊन रस्ते लवकरात लवकर कार्यान्वित करण्याचा आग्रह त्यांनी धरला.
कामगारांच्या सोयीसाठी पीएमपीएमएल बस सेवा शिंदे वसुलीपर्यंत वाढवण्याचा ठोस निर्णय घेण्यात आला. यामुळे हजारो कामगारांना प्रवासात मोठा दिलासा मिळणार असून अपघातांच्या घटना कमी होण्यास मदत होईल. याशिवाय जिल्हाधिकाऱ्यांसोबतच्या बैठकीत वाहतूक व्यवस्थेसाठी ७० ते ८० ट्रॅफिक वॉर्डन नेमण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
उद्योग क्षेत्राला जोडणाऱ्या रस्त्यांची दयनीय अवस्था लक्षात घेऊन हुंदाई कंपनी लगत सेवा रस्त्याचे रुंदीकरण आणि इतर प्रलंबित रस्त्यांची कामे तातडीने सुरू करण्याची ग्वाही देण्यात आली.
बैठकीत आणखी एक गंभीर मुद्दा पुढे आला तो म्हणजे एमआयडीसी परिसरातील वारंवार होणारा वीजपुरवठा खंडित होण्याचा. उत्पादनावर याचा गंभीर परिणाम होत असल्याचे अधोरेखित करत आमदार शेळके यांनी ठोस भूमिका घेतली. उद्योगांसाठी अखंडित वीजपुरवठा हा विकासाचा पाया असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
उद्योग कंपन्यांच्या प्रतिनिधींनीही या बैठकीत सहभाग घेत CSR फंडातून मावळ तालुक्यातील सामाजिक विकास कामांना सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. आमदार शेळके यांनीही CSR फंडातील रक्कम स्थानिक पायाभूत सोयीसुविधांसाठी व समाजकल्याणासाठी वापरण्याची आवश्यकता अधोरेखित केली.
 उपस्थित मान्यवर
या बैठकीत तळेगाव दाभाडे इंडस्ट्रियल असोसिएशनच्या अध्यक्षा श्रीमती अनु सेठी, उपाध्यक्ष जगदीश यादव, तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्याचे वेस्ट पोलीस निरीक्षक रणजीत जाधव, तसेच एफ ई व्हि इंडिया, एल अँड टी डिफेन्स, इनसेन प्रायव्हेट लिमिटेड, हुसको हायड्रोलिक, अॅटलास कोपको, ओगनिबेनी इंडिया लिमिटेड, पोस्को आयपीसी प्रायव्हेट लिमिटेड, चिकात्सो इंडिया, शेक्लर इंडिया, केएसएस प्रायव्हेट लिमिटेड, ए एम लाब्ररिग, बोर्गनॅर इंडिया, व्हिटेस्को टेक्नॉलॉजी, एस एच पिटकर, विनो २ एफ ठी या नामांकित कंपन्यांचे वरिष्ठ अधिकारी व प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या बैठकीत घेतलेले निर्णय हे तळेगाव दाभाडे परिसरातील उद्योग जगत, स्थानिक कामगार व नागरिकांच्या सोयीसाठी दिशादर्शक आणि विकासाभिमुख ठरणार आहेत. वाहतूक व्यवस्था, वीजपुरवठा, रस्त्यांचे सुधारित जाळे आणि CSR फंडाचा योग्य वापर या सर्व घटकांमुळे मावळ तालुक्यातील औद्योगिक विकासाला गती मिळणार आहे.