मुंबई : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी लाखोंच्या संख्येने मराठा बांधव मुंबईत दाखल झाल्याने राज्य सरकारसमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे. या आंदोलनामुळे पहिल्याच दिवशी मुंबई शहरात वाहतूक कोंडी झाली. त्यातच गणेशोत्सवाचा उत्साहही ओसंडून वाहत असल्याने शहरात गर्दी प्रचंड वाढली आहे.
याच पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी मुंबई पोलिसांच्या सर्व सुट्ट्या तातडीने रद्द करण्यात आल्या आहेत. वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून तसेच पोलीस नियंत्रण कक्षातून सतत मोठ्या प्रमाणात मनुष्यबळ उपलब्ध करून देण्याचे आदेश दिले जात आहेत.
पोलिस सूत्रांच्या माहितीनुसार, मुंबईत एकाचवेळी दोन मोठ्या गर्दीचे आव्हान निर्माण झाले आहे. एकीकडे मराठा समाजाच्या आंदोलनाला वेग येत आहे, तर दुसरीकडे गणेशोत्सवात हजारो भाविक मुंबईत दाखल होत आहेत. त्यामुळे सुरक्षा यंत्रणेसमोर दुप्पट जबाबदारी उभी राहिली आहे.
मनोज जरांगे यांच्या अल्टीमेटममुळे राज्य सरकारची कोंडी झाली आहे. आंदोलन किती दिवस चालेल हे निश्चित नसल्याने खबरदारीचा उपाय म्हणून रजा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. शहरातील सर्व संवेदनशील भागात पोलीस तैनात राहणार असून, गर्दीचे नियोजन व कायदा सुव्यवस्था सुरळीत ठेवणे हेच मुंबई पोलिसांसमोरील मोठे आव्हान आहे.
नागरिकांना आवाहन करण्यात आले आहे की, कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नये आणि पोलिस प्रशासनास सहकार्य करावे. मराठा आंदोलन आणि गणेशोत्सवामुळे मुंबई पोलिसांच्या सर्व रजा रद्द; सुरक्षा यंत्रणा उच्च सतर्कतेवर