पिंपरी चिंचवड : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या (PCMC) ४३ व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित क्रीडा स्पर्धांमध्ये अधिकारी आणि कर्मचारी वर्गाने उत्साहाने सहभाग घेतला. महानगरपालिकेच्या क्रीडा विभागाच्या वतीने या मैदानी स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. उद्घाटन समारंभ अतिरिक्त आयुक्त तृप्ती सांडभोर आणि क्रीडा विभागाचे उपायुक्त पंकज पाटील यांच्या हस्ते पार पडला. यावेळी विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
क्रीडा विभागाचे पर्यवेक्षक दीपक कन्हेरे यांनी कार्यक्रमाचे नियोजन आणि समन्वय केला व सर्वांचे मनःपूर्वक आभार मानले. या स्पर्धांचा उद्देश अधिकारी-कर्मचारी यांच्यातील आरोग्यदायी सवयी, टीम स्पिरिट आणि कार्यातील उत्साह वाढविणे हा होता. मैदानावर स्पर्धेचा उत्साह आणि क्रीडाप्रेमाचा जोश सर्वत्र पाहायला मिळाला.
४५ वर्षांखालील पुरुष गटात अग्निशामक विभागाने शानदार कामगिरी केली. १०० मीटर आणि २०० मीटर धावण्याच्या स्पर्धेत सुरज काटे, ओंकार कदम आणि प्रथमेश भोसले यांनी उत्तम प्रदर्शन करत विजेतेपद मिळवले. लांब उडी आणि गोळाफेकमध्येही महेश येवले आणि ओंकार कहाने यांनी बाजी मारली.
४५ वर्षांवरील पुरुष गटात, सुनील जाधव, राहुल शेंडगे, पंकज पाटील आणि सोपान खोसे यांनी विविध स्पर्धांमध्ये उत्कृष्ट कामगिरी केली. या गटातील स्पर्धकांनी वयाच्या पुढे जाऊनही उत्साह आणि तंदुरुस्तीचे उत्तम उदाहरण घालून दिले.
महिला गटातही स्पर्धा तितक्याच रंगल्या. सायली चनगुंडी, नंदिनी खाडे, रूपाली उभे, ममता शिंदे यांनी आपल्या कौशल्याने सर्वांना प्रभावित केले. महिला गटातील खेळाडूंनी मैदानावर चुरशीच्या शर्यती देत उल्लेखनीय प्रदर्शन केले.
४५ वर्षांवरील महिला गटात, सुरेखा कुंजीर, माधुरी चव्हाण आणि वंदना आहेर यांनी विजेतेपद पटकावत स्वतःचा ठसा उमटवला.
या स्पर्धांमधून ‘आरोग्यदायी कर्मचारी, सशक्त प्रशासन’ हा संदेश देत, महापालिकेने आपल्या वर्धापन दिनाचे औचित्य अधिक अर्थपूर्ण बनवले. सर्व विजेत्यांचा सन्मान पुढील कार्यक्रमात करण्यात येणार असल्याची माहिती क्रीडा विभागाने दिली.