नवी दिल्ली : चालू वर्षात देशातील पाच राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका होत असून, यामध्ये देशाच्या सुमारे १७ टक्के लोकसंख्येला नवी सरकारे निवडण्याची संधी मिळणार आहे. या निवडणुका केवळ राज्यस्तरीय सत्तासंघर्षापुरत्या मर्यादित नसून, राष्ट्रीय राजकारणाची दिशा ठरवणाऱ्या मानल्या जात आहेत.
या पाच राज्यांपैकी पश्चिम बंगाल, तामिळनाडू आणि केरळ या राज्यांत भाजपला आजपर्यंत सत्ता मिळवता आलेली नाही, त्यामुळे या निवडणुका भाजपसाठी प्रतिष्ठेची ठरणार आहेत. दुसरीकडे, आसाममध्ये सलग तिसऱ्यांदा सत्ता मिळवण्याचा भाजपचा प्रयत्न असून, पुडुचेरीत दुसऱ्यांदा सरकार स्थापनेचे स्वप्न पक्ष पाहत आहे.
पश्चिम बंगालमध्ये मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यासमोर पुन्हा एकदा भाजपचे मोठे आव्हान आहे. गेल्या १४ वर्षांपासून सत्तेत असलेल्या ममता बॅनर्जी या निवडणुकीत जिंकल्या, तर त्या सलग चौथ्यांदा मुख्यमंत्री बनणाऱ्या देशातील पहिल्या महिला मुख्यमंत्री ठरतील. हा ऐतिहासिक विक्रम ठरेल. याआधी तामिळनाडूच्या माजी मुख्यमंत्री जयललिता यांनी पाच वेळा मुख्यमंत्रीपद भूषवले होते, मात्र ते वेगवेगळ्या कालखंडात होते.
दरम्यान, भारतासोबतच जगातील ३६ देशांमध्येही यावर्षी निवडणुका होणार आहेत. यामध्ये बांगलादेश, नेपाळ यांसारख्या शेजारी देशांचा समावेश आहे. तसेच, पॅलेस्टाईन-गाझा संघर्षात अडकलेल्या इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांचे राजकीय भविष्यही याच वर्षी ठरणार आहे.
एकूणच, हे वर्ष लोकशाहीसाठी निर्णायक मानले जात असून, भारतासह जागतिक राजकारणातही मोठे बदल घडवून आणण्याची क्षमता या निवडणुकांमध्ये आहे.