Home Breaking News प्रयागराज माघ मेळ्याची भव्य सुरुवात; पहिल्याच स्नानाला ९ लाख भाविकांची गर्दी, सुरक्षेचा...

प्रयागराज माघ मेळ्याची भव्य सुरुवात; पहिल्याच स्नानाला ९ लाख भाविकांची गर्दी, सुरक्षेचा कडेकोट बंदोबस्त

31
0
प्रयागराज : महाकुंभानंतरचा पहिला माघ मेळा आज पौष पौर्णिमेच्या पावन मुहूर्तावर मोठ्या उत्साहात सुरू झाला. पहिल्याच दिवशी ९ लाखांहून अधिक भाविकांनी संगमावर पवित्र स्नान केले असून, दिवसभरात ही संख्या १५ लाखांपर्यंत पोहोचण्याचा अंदाज मेला प्रशासनाने व्यक्त केला आहे. गंगा, यमुना आणि अदृश्य सरस्वतीच्या संगमावर ‘हर हर गंगे’च्या जयघोषात भाविकांनी श्रद्धेची डुबकी घेतली.
स्नानानंतर भाविकांनी अक्षयवट, लेटे हनुमान मंदिरासह इतर धार्मिक स्थळांचे दर्शन घेतले. विशेष आकर्षण ठरले ते किन्नर समुदायाने त्रिशूल लहरवत केलेले धार्मिक विधी, ज्यामुळे संपूर्ण परिसर भक्तिमय वातावरणाने भारावून गेला.
दरम्यान, सुरक्षेच्या दृष्टीने प्रशासन सतर्क असून कमांडो, पोलिस आणि विशेष पथके तैनात करण्यात आली आहेत. पहिल्याच दिवशी पोलिसांनी दोन फर्जी बाबांना अटक केली असून, त्यांच्या ताब्यातून बनावट आधार कार्ड आणि नकली नोटा जप्त करण्यात आल्या आहेत. यात्रेच्या नावाखाली फसवणूक करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल, असा इशाराही प्रशासनाने दिला आहे.
महाकुंभात ‘दातून बॉय’ म्हणून प्रसिद्ध झालेला आकाश थार देखील प्रयागराजमध्ये दाखल झाला असून, त्याने माघ मेळ्यात दातूनचा स्वतंत्र कॅम्प उभारण्याची घोषणा केली आहे. यामुळे भाविकांमध्ये उत्सुकता वाढली आहे.
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी अधिकाऱ्यांना थेट फील्डमध्ये उतरून व्यवस्थापन पाहण्याचे आदेश दिले आहेत. “कोणत्याही भाविकाला त्रास होता कामा नये. स्वच्छता, सुरक्षा आणि सोयी-सुविधांमध्ये हलगर्जीपणा खपवून घेतला जाणार नाही,” असा स्पष्ट इशाराही त्यांनी दिला आहे.
माघ मेळ्याच्या पहिल्याच दिवशी उसळलेल्या या भक्तिभावाच्या लाटेमुळे प्रयागराज पुन्हा एकदा आध्यात्मिक राजधानी ठरत असल्याचे चित्र दिसून येत आहे.