Home Breaking News मेरठमध्ये महिला दरोग्याचा वर्दीचा गैरवापर; गाडीतील कपलसोबत शिवीगाळ-मारहाण, व्हिडिओ व्हायरल

मेरठमध्ये महिला दरोग्याचा वर्दीचा गैरवापर; गाडीतील कपलसोबत शिवीगाळ-मारहाण, व्हिडिओ व्हायरल

27
0
मेरठ : उत्तर प्रदेशातील मेरठ शहरात पोलिसांच्या वर्तणुकीवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी धक्कादायक घटना समोर आली आहे. आबूलेन मार्केट या शहरातील अत्यंत वर्दळीच्या परिसरात एका महिला दरोग्याने आपल्या वर्दीची हनक दाखवत कारमध्ये बसलेल्या एका कपलसोबत अश्लील भाषेत शिवीगाळ, धमक्या व मारहाण केल्याचा प्रकार घडला आहे. या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला असून, पोलीस प्रशासनाची प्रतिमा डागाळणारा ठरत आहे.
ही घटना रविवारी सायंकाळी सुमारे 7 वाजता घडली. आबूलेन मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती. याच कोंडीत महिला दरोग्याची कार अडकली होती. तिच्या गाडीसमोर दुसरी कार उभी असल्याने वादाला सुरुवात झाली. प्रत्यक्षदर्शींच्या माहितीनुसार, सुरुवातीला महिला दरोग्याने कारमध्ये बसूनच अश्लील शिवीगाळ सुरू केली, त्यानंतर ती गाडीतून बाहेर उतरली आणि समोरच्या कारमध्ये बसलेल्या कपलशी आक्रमक पद्धतीने वाद घालत मारहाण केली.
व्हायरल व्हिडिओमध्ये महिला दरोगा अत्यंत आक्षेपार्ह आणि धमकीची भाषा वापरताना दिसत असून,
“मी पोलीस वर्दी घालून उभी आहे, दरोगा आहे मी…” अशा शब्दांत ती आपली सत्ता दाखवत असल्याचे स्पष्ट दिसते. विशेष म्हणजे तिच्या कारच्या डॅशबोर्डवर पोलीस कॅप ठेवलेली असल्याचेही व्हिडिओत दिसत आहे, ज्यामुळे ती कर्तव्यावर नसतानाही वर्दीचा प्रभाव टाकत असल्याचा आरोप होत आहे.
या घटनेचा व्हिडिओ तेथे उपस्थित असलेल्या एका नागरिकाने मोबाईलमध्ये टिपला होता, जो सोमवारी सोशल मीडियावर समोर आला आणि काही वेळातच मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला. नागरिकांमध्ये या घटनेबाबत तीव्र संताप व्यक्त होत असून, महिला दरोग्यावर तात्काळ कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.
या प्रकारामुळे पोलीस वर्दीचा गैरवापर, सत्तेचा माज आणि सामान्य नागरिकांवरील दडपशाही यावर पुन्हा एकदा गंभीर चर्चा सुरू झाली आहे. प्रशासनाकडून या प्रकरणाची चौकशी सुरू करण्यात येणार असल्याची शक्यता वर्तवली जात असून, दोषी आढळल्यास संबंधित महिला दरोग्यावर कडक कारवाई होणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.