पिंपरी, पुणे : पिंपरी-चिंचवड शहर जिल्हा काँग्रेस कमिटीला मोठा राजकीय धक्का बसला असून, शहराध्यक्ष डॉ. कैलास महादेव कदम यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. त्यांनी हा राजीनामा काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस खासदार के. सी. वेणुगोपाल यांच्याकडे सुपूर्द केला आहे. मात्र, शहराध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्यानंतरही काँग्रेसचे प्राथमिक सदस्य म्हणून सक्रिय राहणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.
डॉ. कैलास कदम यांची नियुक्ती ७ ऑक्टोबर २०२१ रोजी तत्कालीन काँग्रेस अध्यक्षा खासदार सोनिया गांधी व राष्ट्रीय नेते खासदार राहुल गांधी यांच्या आदेशानुसार करण्यात आली होती. त्या काळात काँग्रेस पक्ष संक्रमण अवस्थेत असताना त्यांनी शहराध्यक्ष पदाची जबाबदारी स्वीकारली होती. संघटन मजबूत करणे, कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण करणे आणि पक्षाचा विचार तळागाळात पोहोचवण्यासाठी त्यांनी विविध उपक्रम राबविले.
सोमवार, दि. २२ डिसेंबर २०२५ रोजी, वैयक्तिक कारणास्तव त्यांनी राजीनामा दिल्याचे राजीनामा पत्रात नमूद केले आहे. राजीनामा पत्रात डॉ. कदम म्हणतात, “मी पिंपरी-चिंचवड शहर (जिल्हा) काँग्रेस अध्यक्ष पदाचा राजीनामा देत असून मला कार्यमुक्त करावे. मात्र, मी पुढे काँग्रेसचा प्राथमिक सदस्य म्हणून कार्यरत राहणार आहे.”
दीर्घ राजकीय प्रवास
माध्यमांशी संवाद साधताना डॉ. कैलास कदम यांनी आपल्या दीर्घ आणि संघर्षमय राजकीय प्रवासाचा आढावा घेतला. विद्यार्थी दशेपासून त्यांनी पिंपरी-चिंचवड शहर व औद्योगिक पट्ट्यात काँग्रेससाठी काम केल्याचे सांगितले. १९९७ साली स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत गांधीनगर पिंपरी वॉर्डमधून काँग्रेस उमेदवार बिनविरोध निवडून आणण्यात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. २००७ मध्ये खराळवाडी वॉर्डमधून निर्मला कदम, तर २०१२ मध्ये गांधीनगर प्रभागातून स्वतःसह काँग्रेसचे सर्व उमेदवार निवडून आणण्यात यश मिळवले.
याच कालावधीत त्यांना पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेत गटनेता व विरोधी पक्षनेता म्हणून जबाबदारी देण्यात आली. २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत त्यांना चिंचवड विधानसभा मतदारसंघाची उमेदवारी मिळाली होती.
काँग्रेससाठी योगदान कायम
डॉ. कदम यांनी स्पष्ट केले की, पक्ष अडचणीत असताना काँग्रेसने त्यांच्यावर शहराध्यक्ष पदाची जबाबदारी सोपवली आणि त्या विश्वासास पात्र ठरण्यासाठी त्यांनी शंभर टक्के योगदान दिले. “मी फक्त शहराध्यक्ष पदाचा राजीनामा दिला आहे, काँग्रेस पक्षाशी नाते तुटलेले नाही. पुढेही काँग्रेसचा निष्ठावंत कार्यकर्ता म्हणून काम करत राहीन,” असे त्यांनी ठामपणे सांगितले.
डॉ. कैलास कदम यांच्या राजीनाम्यामुळे पिंपरी-चिंचवड काँग्रेसच्या आगामी राजकीय वाटचालीवर काय परिणाम होणार, तसेच नवीन शहराध्यक्ष कोण? याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.