Home Breaking News सणासुदीची गोड बातमी : महाराष्ट्राला केंद्राकडून मिळाले ६ हजार ४१८ कोटी रुपये,...

सणासुदीची गोड बातमी : महाराष्ट्राला केंद्राकडून मिळाले ६ हजार ४१८ कोटी रुपये, अजित पवारांनी मानले मोदी सरकारचे आभार

48
0
मुंबई : सणासुदीच्या काळात केंद्र सरकारकडून राज्य सरकारांना कराचे आगाऊ हस्तांतरण करण्यात आले असून महाराष्ट्राला तब्बल ६ हजार ४१८ कोटी रुपये प्राप्त झाले आहेत. हे हस्तांतरण १० ऑक्टोबर २०२५ रोजी होणाऱ्या नियमित मासिक हस्तांतरणाव्यतिरिक्त आहे. त्यामुळे राज्याच्या खजिन्यात मोठी भर पडली आहे.

या निर्णयाबद्दल उपमुख्यमंत्री तथा वित्त आणि नियोजन मंत्री अजित पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांचे मनःपूर्वक आभार मानले आहेत. त्यांनी म्हटले की, “सणासुदीच्या हंगामात मिळालेली ही मदत महाराष्ट्राला भांडवली खर्च वाढवण्यासाठी आणि विकासाच्या गतीस चालना देण्यासाठी उपयुक्त ठरेल.”

अजित पवार पुढे म्हणाले की, “या निधीचा उपयोग राज्यातील कल्याणकारी योजनांसाठी, शेतकरी, कामगार, गरीब व मध्यमवर्गीयांसाठी सुरू असलेल्या विविध योजनांना वित्तपुरवठा करण्यासाठी केला जाणार आहे. तसेच महाराष्ट्रातील पायाभूत सुविधा, रस्ते, पूल, शाळा, आरोग्यसेवा आणि इतर प्रकल्पांना याचा थेट लाभ होणार आहे.”
केंद्राकडून मिळालेला हा निधी महाराष्ट्रासाठी आर्थिकदृष्ट्या दिलासा देणारा ठरला आहे. विशेषतः सणासुदीच्या पार्श्वभूमीवर ग्राहकांची खरेदीशक्ती वाढवणे, उद्योगधंद्यांना चालना देणे आणि रोजगारनिर्मितीस मदत करणे या दृष्टीने या निधीचा मोठा उपयोग होणार आहे. राज्याला मिळालेला हा निधी म्हणजे महाराष्ट्राच्या विकासयात्रेला बळकटी देणारे पाऊल असल्याचे आर्थिक तज्ज्ञांचे मत आहे.