पुणे : शहराच्या वाहतुकीला नवे बळ देणारा आणि नागरिकांसाठी सोयीस्कर ठरणारा मुठा नदीवरील पादचारी पूल अखेर आज पुणेकरांच्या सेवेत दाखल झाला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते छत्रपती संभाजी उद्यान मेट्रो स्थानक ते शनिवार पेठ यांना जोडणाऱ्या या अत्याधुनिक पुलाचे लोकार्पण करण्यात आले. या पुलामुळे हजारो पुणेकरांचा रोजचा प्रवास अधिक सुकर होणार असून विशेषतः पादचारी आणि सायकलस्वारांसाठी ही सुविधा वरदान ठरणार आहे.
उद्घाटन सोहळ्याला केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, राज्यमंत्री माधुरी मिसाळ, आमदार हेमंत रासने, आमदार सुनील कांबळे, आमदार सिद्धार्थ शिरोळे आदी मान्यवर उपस्थित होते. पुलाचे बांधकाम आकर्षक रचना, आधुनिक तंत्रज्ञान आणि सुरक्षिततेच्या दृष्टीने केलेले असल्याने हा पूल पुण्याच्या सौंदर्यात भर घालणार आहे.
शहरातील वाहतुकीवरचा ताण कमी करून ऐतिहासिक शनिवार पेठ व गजबजलेल्या संभाजी उद्यान परिसराला जोडणारा हा पूल पर्यटन आणि स्थानिक नागरिकांसाठी विशेष आकर्षण ठरणार आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांनी या प्रकल्पाचे कौतुक करताना पुणेकरांना शुभेच्छा दिल्या आणि पुढेही अशा नागरी सुविधा उभारण्याचे आश्वासन दिले.