Home Breaking News चाकणमध्ये घुमले जरांगे पाटलांचे आवाज – मराठा मोर्चा थेट आझाद मैदानाच्या दिशेने!

चाकणमध्ये घुमले जरांगे पाटलांचे आवाज – मराठा मोर्चा थेट आझाद मैदानाच्या दिशेने!

78
0
पुणे : मराठा समाजाच्या हक्कासाठी चाललेल्या ऐतिहासिक आंदोलनाचा जाज्वल्य अध्याय आज चाकणमध्ये लिहिला गेला. मनोज जरांगे पाटलांच्या नेतृत्वाखाली मराठा बांधवांनी पुन्हा एकदा ताकद दाखवत आवाज बुलंद केला. चाकणमधील सभेत “आरक्षण आमचा जन्मसिद्ध हक्क आहे!” या घोषणांचा गजर झाला आणि हजारो कार्यकर्त्यांच्या जयघोषाने संपूर्ण परिसर दणाणून गेला.
जरांगे पाटलांनी आपल्या भाषणात ठाम इशारा दिला – “आम्हाला थांबवता येणार नाही, आमची चाल आझाद मैदानाकडे आहे! सरकारने त्वरित निर्णय घ्यावा, अन्यथा जनआंदोलनाची ज्वाला अधिक भडकणार आहे.” त्यांच्या प्रत्येक शब्दाला उपस्थित जनसमुदायाचा गगनभेदी प्रतिसाद मिळाला.
चाकणमधून निघालेल्या या मोर्चाने ऐक्य, शिस्त आणि जिद्दीचा अनोखा नमुना दाखवला. महिलांचा उत्स्फूर्त सहभाग, तरुणांची उर्जा आणि ज्येष्ठांची साथ पाहून आंदोलनाचे वातावरण अधिक दृढ झाले. भगवे झेंडे, समाजाच्या मागण्यांचे फलक आणि शिवरायांच्या घोषणांनी रस्ते भारावून गेले होते.
मोर्चाचा हा प्रचंड लोंढा आता थेट मुंबईच्या दिशेने सरकत असून अंतिम लक्ष्य – आझाद मैदान! येथे ऐतिहासिक संघर्ष उभा राहणार आहे. पुणे विभागातून निघालेल्या या आंदोलनाची गाज आता संपूर्ण राज्यभर पोहोचली असून समाजाच्या अपेक्षा आणि सरकारवरील दबाव प्रचंड वाढला आहे. चाकणनंतर मराठा क्रांतीचे हे वादळ थेट राजधानीत धडकणार, निर्णायक लढ्याची उलटीगणती सुरू झाली आहे!