मुंबई : मराठा समाजाच्या हक्कांसाठी लढा देत असलेले संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली मानखुर्द येथून आजाद मैदानाकडे “मराठा क्रांती मोर्चा” भव्यतेने मार्गक्रमण करणार आहे. समाजातील युवक, महिला, शेतकरी, कामगार यांचा प्रचंड उत्साह या मोर्चात पाहायला मिळत आहे. हक्कासाठीच्या या लढ्यात पोलिसांचा मोठा बंदोबस्त करण्यात आला असून, प्रशासन सतत परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे.
या मोर्चाच्या माध्यमातून सरकारला स्पष्ट संदेश देण्यात येणार असून, मराठ्यांच्या आरक्षणाच्या प्रश्नावर ठोस निर्णय घेण्याची मागणी पुन्हा एकदा जोर धरत आहे. शांततामय पद्धतीने आंदोलन करण्याचा निर्धार समाजाने घेतला आहे. मोर्चात सहभागी होणाऱ्यांकडून “जय जिजाऊ, जय शिवराय” च्या घोषणांनी परिसर दुमदुमत आहे.
मनोज जरांगे पाटील यांनी दिलेल्या संदेशात म्हटले आहे की, “मराठा समाजाचा लढा हा न्यायासाठी आहे, कुणाविरुद्ध नाही. सरकारने भीती न बाळगता समाजाला न्याय द्यावा. जर न्याय न दिला, तर लढा आणखी तीव्र केला जाईल.”
या मोर्चामुळे मुंबईतील अनेक भागांत वाहतूक व्यवस्था विस्कळीत होण्याची शक्यता आहे. पोलिसांनी नागरिकांना पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन केले आहे. मात्र समाजाच्या उत्साहामुळे संपूर्ण मुंबईत मराठा आंदोलनाचे वातावरण निर्माण झाले आहे. मराठा समाजाच्या या ऐतिहासिक मोर्चामुळे पुन्हा एकदा राज्यातील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे.