नवी दिल्ली : सणासुदीच्या पार्श्वभूमीवर मोदी सरकारने सर्वसामान्य जनतेला मोठा दिलासा देणारा निर्णय घेतला आहे. केंद्रीय वित्त मंत्री निर्मला सीतारमण यांनी जाहीर केलेल्या या बदलानुसार, जीएसटीचे १२% आणि २८% करस्लॅब रद्द करण्यात येणार आहेत.
सध्या जीएसटीचे चार स्लॅब आहेत – ५%, १२%, १८% आणि २८%. यापैकी दोन स्लॅब रद्द झाल्यानंतर कर संरचनेत मोठी सुलभता येणार आहे. सरकारचा दावा आहे की या निर्णयामुळे महागाईचा बोजा कमी होईल आणि सर्वसामान्यांना मोठा आर्थिक दिलासा मिळेल.
काय होणार स्वस्त?
कपडे व रेडिमेड वस्त्रं
चप्पल, बूट
प्रिंटिंग आणि स्टेशनरी सामान
प्रक्रिया केलेले अन्न पदार्थ
होम अप्लायन्सेस
याशिवाय मोठ्या वस्तूंवरही दिलासा मिळणार आहे. दुचाकी, चारचाकी गाड्या, सिमेंट, बिल्डिंग मटेरियल, फ्रीज, वॉशिंग मशीन, एसी, टीव्ही, पेंट्स व वॉर्निश या वस्तूंवर जीएसटी कमी होईल. त्यामुळे ग्राहकांना थेट फायदा होणार आहे.
आरोग्य व जीवन विम्यावरही दिलासा? या बैठकीत एक महत्त्वाची चर्चा झाली ती म्हणजे आरोग्य आणि जीवन विम्यावर जीएसटी माफीची शक्यता. सध्या या पॉलिसींच्या प्रीमियमवर १८% जीएसटी लागू आहे. जर हा प्रस्ताव मंजूर झाला तर विमा प्रीमियम स्वस्त होणार असून, लाखो पॉलिसीधारकांना मोठा फायदा होईल.
तज्ज्ञांच्या मते, या निर्णयामुळे ग्राहकांच्या खरेदी क्षमतेत वाढ होईल आणि अर्थव्यवस्थेला गती मिळेल. सणासुदीच्या काळात बाजारपेठेत नवचैतन्य येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
मोदी सरकारकडून दिलासादायक निर्णय – GST चे १२% आणि २८% स्लॅब रद्द; कपडे, वाहनं, गृहउपयोगी वस्तू होतील स्वस्त!