पुणे | महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री व पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी आज पहाटेपासून पुणे जिल्ह्यातील विविध विकासकामांची आकस्मिक पाहणी सुरू केली. सकाळी सहा वाजल्यापासून सुरू झालेल्या या दौऱ्याचा एक महत्त्वाचा टप्पा हिंजवडी आयटी पार्क परिसर होता. मात्र या ठिकाणी विकासकामांमध्ये भूसंपादनाची अडचण दिसून आली आणि त्यावरून अजित पवारांनी थेट स्थानिक सरपंच गणेश जांभूळकर यांना चांगलेच खडेबोल सुनावले.
“धरणं बांधताना मंदिरं पाण्यात जातातच की!”
भूसंपादनास होणाऱ्या विरोधावर संतप्त होत अजित पवार म्हणाले, “अहो, असू द्या… धरणं बांधताना मंदिरं पाण्यात जातातच की नाही!” ते याच्यावरच थांबले नाहीत. जांभूळकर यांनी आपली भूमिका ऐकून घ्यावी, असं सांगितल्यावर अजित पवार म्हणाले, “तुम्हाला जे सांगायचं ते सांगा, मी ऐकून घेतो. पण मी काय करायचं ते मी करतो!”
“हिंजवडी बंगलोर, हैदराबादला जातंय – कुणालाच काही पडलं नाही!”
अजित पवारांनी आयटी क्षेत्रातील स्पर्धात्मक शहरांशी तुलना करत संताप व्यक्त केला. “हिंजवडी आयटी पार्क बंगलोर, हैदराबादला जात आहे, पण कुणाला काहीच पडलं नाही!” अशी बोचरी टिप्पणी करत त्यांनी स्थानिक नेत्यांच्या उदासीनतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं.
मीडियावरही संताप – “ये कॅमेरा बंद कर!”
ही संपूर्ण घटना प्रसारमाध्यमांच्या कॅमेऱ्यात कैद झाली. मात्र, संवाद रेकॉर्ड होत असल्याचे लक्षात येताच अजित पवार चिडले आणि म्हणाले, “ये कॅमेरा बंद कर!”
विकासकामांवर अडथळा – भूसंपादन न केल्याचा परिणाम
अजित पवारांनी स्पष्टपणे सांगितले की, स्थानिक नेते आणि पदाधिकाऱ्यांनी भूसंपादनास विरोध केल्याने हिंजवडीतील विकासकामांना खीळ बसली आहे. त्यांनी अधिकाऱ्यांना तात्काळ कार्यवाहीचे आदेश दिले.
चर्चांना उधाण – अजितदादांची आक्रमक शैली पुन्हा चर्चेत
अजित पवार यांची ही थेट आणि आक्रमक भूमिका सध्या चर्चेचा विषय बनली आहे. पुण्यातील विकासकामे गती घेणार की राजकीय व प्रशासकीय अडचणीमुळे पुन्हा थांबणार – हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.