साहित्य सम्राट संस्थेचे २३० वे कविसंमेलन उत्साहात संपन्न.
पुणे, दि. ३० सप्टेंबर २०२६ : साहित्य सम्राट संस्था व समाज विकास संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने मांजरी फार्म येथील कृषी तंत्र विद्यालयात २९ सप्टेंबर रोजी पुरस्कार वितरण सोहळा व साहित्य सम्राट संस्थेचे २३० वे कविसंमेलन उत्साहात पार पडले. विद्यालयाचे प्राचार्य अमित पवार आणि साहित्य सम्राट संस्थेचे अध्यक्ष, कवी व साहित्यिक विनोद अष्टुळ यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम झाला.
कार्यक्रमाला विद्यालयातील शिक्षक, विद्यार्थी-विद्यार्थिनी यांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला. माजी आमदार गजानन बापू शेवाळे, सामाजिक कार्यकर्ते योगेश कुलकर्णी, सुप्रसिद्ध अभिनेते विकास समुद्रे, बाळासाहेब विभूते आणि संपादक शिवराम कांबळे यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाचे आयोजन देविदास झुरंगे यांनी केले.
यावेळी शैक्षणिक, सामाजिक, कृषी तसेच विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांचा पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. महाराष्ट्रातील विविध भागांतील कवी-कवयित्रींनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत काव्य मैफल रंगवली. शालेय विद्यार्थी-विद्यार्थिनींनीही मनोरंजनात्मक कविता सादर करून उपस्थितांची दाद मिळवली.
कवी डॉ. जयद्रथ आखाडे यांनी ‘जन पळभर म्हणतील हाय हाय’ ही काव्यरचना सादर केली. माणूस गेल्यानंतर त्याचे गुणगान करण्यापेक्षा त्याने जिवंतपणी समाजासाठी काय कार्य केले, हा संदेश या कवितेतून देण्यात आला. त्यांच्या प्रभावी सादरीकरणाने उपस्थितांची मने जिंकली.
दरम्यान, अनेक कवींनी शेती-माती, निसर्ग, आई-वडील, वृक्षसंवर्धन आणि ग्रामीण जीवन अशा विविध विषयांवर कविता सादर करून कविसंमेलनाची रंगत वाढवली. विविध क्षेत्रांतील मान्यवरांचा सन्मान आणि काव्य सादरीकरणामुळे कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.


