Home Breaking News बनावट कागदपत्रांद्वारे ‘श्री राधाकृष्ण चॅरिटेबल ट्रस्ट’मध्ये गैरव्यवहार; अध्यक्षासह पत्नीविरोधात गुन्हा.

बनावट कागदपत्रांद्वारे ‘श्री राधाकृष्ण चॅरिटेबल ट्रस्ट’मध्ये गैरव्यवहार; अध्यक्षासह पत्नीविरोधात गुन्हा.

43
0

बनावट कागदपत्रांद्वारे ‘श्री राधाकृष्ण चॅरिटेबल ट्रस्ट’मध्ये गैरव्यवहार; अध्यक्षासह पत्नीविरोधात गुन्हा.œ

पिंपरी :१५ सप्टेंबर..

पिंपरी येथील वास्तू उद्योग कॉलनीतील ‘श्री राधाकृष्ण चॅरिटेबल ट्रस्ट’ गिळंकृत करण्याच्या हेतूने मूळ विश्वस्तांच्या बनावट सह्या करून परस्पर फेरबदल केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. न्यायालयाच्या आदेशानंतर संत तुकारामनगर पोलिस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणी दत्तानंद नामदेव सोनवळकर (वय ६०) आणि वीणा दत्तानंद सोनवळकर (वय ५५, दोघे रा. प्रेम अंगण, उद्यमनगर, पिंपरी) यांच्याविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. माजी नगरसेवक अर्जुन बाबूराव ठाकरे (वय ६९, रा. अजमेरा कॉलनी, पिंपरी) यांनी फिर्याद दिली आहे.

फिर्यादीनुसार, दत्तानंद सोनवळकर हे ट्रस्टचे अध्यक्ष असताना नियमांचे उल्लंघन करून दानपेटीतील रक्कम परस्पर घेणे तसेच मंदिरातील मौल्यवान धातूची भांडी, समई आणि चांदीचे ताट स्वतःच्या घरी नेल्याचा आरोप आहे.

तसेच, कोविड काळात (२०२०) मूळ विश्वस्तांच्या आधारावर त्यांच्या खोट्या सह्या, बनावट बैठकीचे ठराव आणि बनावट ‘ना हरकत प्रमाणपत्र’ (NOC) तयार करून सह धर्मादाय आयुक्त कार्यालयात सादर केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. या माध्यमातून मूळ विश्वस्तांना पदावरून हटवून त्यांच्या जागी स्वतःच्या मर्जीतील व्यक्तींची विश्वस्त, सचिव व खजिनदार म्हणून नियुक्ती दाखवून ट्रस्टवर ताबा मिळवण्याचा प्रयत्न केल्याचे नमूद आहे.

अधिकृत हस्ताक्षर तज्ज्ञांच्या तपासणीत मूळ विश्वस्तांच्या सह्या बनावट असल्याचे स्पष्ट झाल्याचे तक्रारीत म्हटले आहे. न्यायालयाच्या आदेशानुसार झालेल्या चौकशी अहवालाच्या आधारे प्रथमदर्शनी गुन्हा घडल्याचे निष्पन्न झाल्यानंतर पोलिसांनी दोघांविरोधात फसवणूक, बनावट दस्तऐवज तयार करणे आणि गुन्हेगारी कट यांसारख्या आरोपांप्रकरणी कायदेशीर कारवाई सुरू केली आहे.