Home Breaking News महाराष्ट्रात 35 हजार कोटींचा नवा महामार्ग!कल्याण–लातूर प्रवास 11 तासांवरून अवघ्या 4 तासांवर;...

महाराष्ट्रात 35 हजार कोटींचा नवा महामार्ग!कल्याण–लातूर प्रवास 11 तासांवरून अवघ्या 4 तासांवर; माळशेज घाटाला मिळणार बायपास.

53
0

महाराष्ट्रात 35 हजार कोटींचा नवा महामार्ग!कल्याण–लातूर प्रवास 11 तासांवरून अवघ्या 4 तासांवर; माळशेज घाटाला मिळणार बायपास.

पुणे | १४ सप्टेंबर :

महाराष्ट्राच्या रस्ते वाहतूक व्यवस्थेला मोठी चालना देणारा कल्याण–लातूर जनकल्याण एक्सप्रेसवे उभारण्याच्या प्रकल्पाला राज्य सरकारकडून मान्यता देण्यात आली आहे. तब्बल 442 किमी लांबीचा आणि 6 पदरी प्रवेश-नियंत्रित ग्रीनफिल्ड द्रुतगती मार्ग उभारण्यात येणार असून, या प्रकल्पासाठी अंदाजे 35 हजार कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे.

 प्रवासाचा वेळ मोठ्या प्रमाणात कमी होणार

सध्या कल्याण ते लातूर प्रवासासाठी सुमारे 10 ते 11 तासांचा वेळ लागतो. मात्र, नव्या एक्सप्रेसवेमुळे हा प्रवास अंदाजे 4 तासांपर्यंत कमी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे मुंबई महानगर प्रदेश, ठाणे आणि कल्याण परिसरातून मराठवाड्यात जाणाऱ्या नागरिकांना मोठा फायदा होणार आहे.

 माळशेज घाटाला मिळणार बायपास

या प्रकल्पाचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे माळशेज घाटासाठी सुमारे 8 किमी लांबीचा बोगदा प्रस्तावित आहे. या बोगद्यामुळे माळशेज घाटातील धोकादायक वळणे, चढ-उतार आणि वाहतूक कोंडी टाळता येणार आहे. परिणामी या मार्गावरील प्रवास अधिक सुरक्षित आणि वेगवान होण्याची अपेक्षा आहे.

कोणत्या भागांना जोडणार?

हा महामार्ग कल्याण, मुरबाड, माळशेज घाट, ओतूर (आळेफाटा), अहिल्यानगर, पाथर्डी, बीड, मांजरसुंबा आणि अंबाजोगाई मार्गे लातूरला जोडला जाणार आहे. हा मार्ग विद्यमान कल्याण–अहमदनगर–नांदेड राष्ट्रीय महामार्गाला समांतर असणार आहे.

भविष्यात शक्तिपीठ एक्सप्रेसवेशी कनेक्टिव्हिटी

भविष्यात लातूरजवळ या महामार्गाला नागपूर–गोवा शक्तिपीठ एक्सप्रेसवेशी जोडण्याचे नियोजन आहे. त्यामुळे विदर्भ, मराठवाडा, कोकण आणि गोवा यांच्यातील हायस्पीड कनेक्टिव्हिटीला मोठी चालना मिळण्याची शक्यता आहे.

35 हजार कोटींचा हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर महाराष्ट्रातील दळणवळण, उद्योग, व्यापार आणि प्रादेशिक विकासाला मोठी गती मिळण्याची अपेक्षा आहे.