सातारा:धनगरवाडीत गॅस गळतीचा भीषण स्फोट; स्वयंपाकगृहाची इमारत कोसळली, कंपनीला सुटी असल्याने अनर्थ टळला.
शिरवळ | १४ सप्टेंबर .
खंडाळा तालुक्यातील धनगरवाडी एमआयडीसी परिसरातील एका बहुराष्ट्रीय कंपनीच्या स्वयंपाकगृहात पीएनजी गॅस पाइपलाइन सुरू राहिल्याने हवेचा दाब तयार होऊन गॅस गळती झाली. त्यानंतर झालेल्या भीषण स्फोटात स्वयंपाकगृहाची इमारत कॉलमसह पूर्णपणे कोसळली. ही घटना शनिवार, दि. १२ सप्टेंबर रोजी रात्री सुमारे अकराच्या सुमारास घडली.
शनिवारी कंपनीला सुटी असल्याने स्वयंपाकगृह व कंपनी परिसरात कर्मचारी उपस्थित नव्हते. परिसरात केवळ सुरक्षारक्षक असल्याने मोठी जीवितहानी टळली. गॅस पाइपलाइन सुरू राहिल्याने स्वयंपाकगृहात गॅस साचून दबाव निर्माण झाला आणि अचानक मोठा स्फोट झाला. स्फोटाची तीव्रता इतकी होती की, स्वयंपाकगृहाची संपूर्ण इमारत पत्त्यांच्या बंगल्याप्रमाणे कोसळली.
स्फोटाचा मोठा आवाज होताच कंपनी परिसरात गोंधळ उडाला. घटनेची माहिती मिळताच कंपनीचे अधिकारी तसेच शिरवळ पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक महेश इंगळे हे पोलिस कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी दाखल झाले. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी तसेच आग किंवा पुढील दुर्घटना टाळण्यासाठी एशियन पेंट्सच्या अग्निशमन बंबासह इतर ठिकाणच्या अग्निशमन बंबांना तातडीने पाचारण करण्यात आले.
या दुर्घटनेत स्वयंपाकगृहाच्या इमारतीचे मोठे नुकसान झाले असून, प्राथमिक माहितीनुसार लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचे सांगण्यात येत आहे. सुदैवाने कंपनीला सुटी असल्यामुळे कर्मचारी स्वयंपाकगृहात उपस्थित नसल्याने मोठा अनर्थ टळला. घटनेची नोंद व पुढील तपासाची प्रक्रिया उशिरापर्यंत सुरू होती.


