पुणे ग्रामीणमध्ये मारहाण, धमकी आणि घरफोडीच्या घटनांनी खळबळ.
विविध पोलीस ठाण्यांत गंभीर गुन्हे दाखल; घरफोडीत तब्बल १ लाख ९४ हजारांचा मुद्देमाल चोरीस
पुणे ग्रामीण | ३१ ऑगस्ट २०२६ :
पुणे ग्रामीण पोलीस हद्दीत मागील काही दिवसांत मारहाण, दुखापत, धमकी, रस्ता अडवून आंदोलन तसेच घरफोडी चोरीच्या विविध घटना समोर आल्या आहेत. या प्रकरणी संबंधित पोलीस ठाण्यांमध्ये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
इंदापूर तालुका : पळसदेव परिसरात २९ ऑगस्ट रोजी रात्री साडेआठच्या सुमारास जुन्या शरीरसंबंधाच्या कारणावरून महिलेला मारहाण केल्याची घटना घडली. शिवाजी रुपसिंग भुई आणि इतरांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संबंधित महिलेच्या डोक्याला दुखापत झाल्याचे तक्रारीत नमूद आहे.
सासवड परिसर : उदाचीवाडी येथे शेतीच्या जागेवरून झालेल्या वादातून फिर्यादीला शिवीगाळ करून दगडाने मारहाण केल्याचा प्रकार समोर आला. या प्रकरणी चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
भोर तालुका : वेलू परिसरात शेतातील जनावरे चारण्याच्या कारणावरून वाद झाला. या वादातून फिर्यादी व त्यांच्या भावाला लाथाबुक्क्यांनी तसेच लाकडी दांडक्याने मारहाण करून दुखापत केल्याची तक्रार आहे.
बारामती परिसर : दंडवाडी येथे कोंबड्यांच्या पिलांच्या वाटणीवरून वाद झाला. या वादातून फिर्यादीच्या हातावर लाकडी काठीने मारहाण करण्यात आल्याचे पोलिसांत नोंदविण्यात आले आहे.
शिरूर तालुका : तळेगाव ढमढेरे परिसरात क्रिकेट खेळण्यावरून झालेल्या वादात तरुणाला शिवीगाळ व मारहाण करण्यात आली. लोखंडी पहार व टिकावाने मारहाण करून डोक्याला दुखापत केल्याचा आरोप आहे
