समृद्धी महामार्गावर दरोडेखोरांचा धुमाकूळ! कुटुंबाला घेरून तब्बल ₹18 लाखांची लूट
सिन्नर : समृद्धी महामार्गावर छत्रपती संभाजीनगरहून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या एका कुटुंबाच्या कारच्या टायरसमोर दरोडेखोरांनी लोखंडी वस्तू टाकून टायर पंक्चर केला.
कार थांबताच सुमारे १० ते १२ दरोडेखोरांनी वाहनाला चारही बाजूंनी घेरले. त्यांच्या हातात लोखंडी रॉड व दांडके होते. प्रवाशांना मारहाण करत लहान मुलांनाही कारमधून बाहेर ओढण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचे समोर आले आहे.
घाबरलेल्या कुटुंबीयांकडून सोन्याचे दागिने, महागडी घड्याळे आणि रोख रक्कम असा एकूण ₹18 लाख 9 हजार 500 रुपयांचा ऐवज जबरदस्तीने लुटण्यात आला. याच परिसरात इतर वाहनांनाही लक्ष्य करण्याचा प्रयत्न झाल्याची माहिती समोर आली आहे.
🔴 Dash Cam मुळे दरोड्याचा प्रकार उघडकीस
या घटनेदरम्यान कारच्या Dash Cam मध्ये संपूर्ण प्रकार रेकॉर्ड झाल्याचे वृत्त आहे. त्यामुळे पोलिसांच्या तपासाला महत्त्वाचा पुरावा मिळण्याची शक्यता आहे.
या प्रकरणी वावी पोलिस ठाण्यात BNS कलम 310(2) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून दरोडेखोरांचा शोध सुरू आहे. महामार्गावरील गस्त वाढवण्यात आल्याचेही वृत्त आहे.

