पिंपरी-चिंचवड पोलिस दलात मोठा फेरबदल; १० निरीक्षकांच्या महत्त्वाच्या ठिकाणी नियुक्त्या.

पिंपरी-चिंचवड, दि. २३ ऑगस्ट : पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयात प्रशासकीय फेरबदल करण्यात आला असून, बदलीवरून नव्याने हजर झालेल्या १० पोलिस निरीक्षकांना विविध महत्त्वाच्या ठिकाणी नियुक्त्या देण्यात आल्या आहेत. गुन्हे शाखा, वाहतूक शाखा, विशेष शाखेसह हिंजवडी, पिंपरी, निगडी आणि चाकण येथील पोलिस ठाण्यांची जबाबदारी नव्या अधिकाऱ्यांकडे सोपविण्यात आली आहे.
नियुक्तीनुसार अमोल चंद्रकांत गवळी यांच्याकडे गुन्हे शाखेची, देवेंद्र परशराम चव्हाण यांच्याकडे पोलिस आयुक्तांचे वाचक, हेमंत पोपटराव कदम यांच्याकडे विशेष शाखा आणि राजेन्द्र जयवंत निकाळजे यांच्याकडे वाहतूक शाखेची जबाबदारी देण्यात आली आहे.
तसेच सिद्धराम महादेव म्हेत्रे यांची हिंजवडी, विजयकुमार गोरख शिंदे यांची पिंपरी, चंद्रकांत विनायक जाधव यांची निगडी, तर प्रशांत ज्ञानोबा आरदवाड यांची चाकण उत्तर पोलिस ठाण्यात नियुक्ती करण्यात आली आहे. गीताराम लक्ष्मण शेवाळे यांच्याकडे नियंत्रण कक्षाची, तर सुरेखा शरद घार्गे यांच्याकडे गुन्हे शाखेची जबाबदारी देण्यात आली आहे.
या फेरबदलामुळे शहरातील गुन्हेगारीला आळा घालणे, वाहतूक व्यवस्था सुधारणे आणि कायदा-सुव्यवस्था अधिक सक्षम करण्यावर भर राहण्याची अपेक्षा आहे. संबंधित अधिकाऱ्यांना तत्काळ पदभार स्वीकारण्याचे आदेश देण्यात आले आहेत.


