मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते नवी मुंबईत व्यसनमुक्ती केंद्राचे उद्घाटन; नशामुक्त नवी मुंबईचा संकल्प.

नवी मुंबई: 22 ऑगस्ट: नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या ‘नशामुक्त नवी मुंबई’ अभियानांतर्गत ‘कॅम्पस कनेक्ट’ उपक्रमाचा शुभारंभ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नवी मुंबई पोलीस आणि नवी मुंबई महानगरपालिकेच्या संयुक्त पुढाकारातून सुरू करण्यात आलेल्या व्यसनमुक्ती व पुनर्वसन केंद्राचे रिमोटद्वारे उद्घाटन केले.
विद्यार्थ्यांनी अमली पदार्थांपासून दूर राहून शिक्षण, क्रीडा, कौशल्यविकास आणि राष्ट्रउभारणीकडे वळावे, असे आवाहन मुख्यमंत्री फडणवीस यांनी केले. तरुणांमध्ये अमली पदार्थांचे वाढते आकर्षण आणि त्याचे सामाजिक, शारीरिक व मानसिक दुष्परिणाम लक्षात घेता, विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती निर्माण करणे हा ‘कॅम्पस कनेक्ट’ उपक्रमाचा प्रमुख उद्देश आहे.
भारताची ६५ टक्के युवाशक्ती ही देशाची मोठी ताकद असून, या शक्तीला व्यसनांपासून दूर ठेवण्यासाठी अमली पदार्थांची पुरवठा साखळी मोडीत काढण्यासोबतच तरुणांमध्ये जागृती निर्माण करणे आवश्यक असल्याचे फडणवीस यांनी सांगितले. प्रत्येक शैक्षणिक कॅम्पस हे नशाविरोधी लढ्याचे केंद्र असून, प्रत्येक विद्यार्थी या मोहिमेचा सैनिक आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.
व्यसनाच्या आहारी गेलेल्या विद्यार्थ्यांना भेदभाव न करता व्यसनमुक्ती केंद्रांच्या माध्यमातून मदत केली जाईल, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. यावेळी व्यसनमुक्तीवरील चित्रफितीचे लोकार्पण करण्यात आले. तसेच जनजागृतीपर पोस्टर्स व रील्स स्पर्धेतील विजेत्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.
पोलीस, महानगरपालिका, नागरिक आणि तरुणाईच्या संयुक्त प्रयत्नांतून नवी मुंबईला पूर्णपणे नशामुक्त आणि सुरक्षित बनवण्याचा संकल्प यावेळी करण्यात आला. कार्यक्रमाला मंत्री गणेश नाईक, मंत्री भरत गोगावले, आमदार विक्रांत पाटील, रविंद्र फाटक, मंदा म्हात्रे, महेश बालदी यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.
