Home Breaking News मोशीतील वेस्ट-टू-एनर्जी प्रकल्पात भीषण दुर्घटना; कचऱ्याचा डोंगर इमारतीवर कोसळला, 10 ते 15...

मोशीतील वेस्ट-टू-एनर्जी प्रकल्पात भीषण दुर्घटना; कचऱ्याचा डोंगर इमारतीवर कोसळला, 10 ते 15 जण अडकल्याची भीती.

18
0

मोशीतील वेस्ट-टू-एनर्जी प्रकल्पात भीषण दुर्घटना; कचऱ्याचा डोंगर इमारतीवर कोसळला, 10 ते 15 जण अडकल्याची भीती.

पिंपरी-चिंचवड, दि. ८ जुलै : पुणे व पिंपरी-चिंचवड परिसरात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे मोशी येथील पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वेस्ट-टू-एनर्जी प्रकल्पात भीषण दुर्घटना घडली. कचरा डेपोतील कचऱ्याच्या डोंगराचे भूस्खलन होऊन तो प्रकल्पाच्या इमारतीवर कोसळल्याने इमारतीचा काही भाग खचला. या दुर्घटनेत 10 ते 15 कर्मचारी ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत असून बचावकार्य युद्धपातळीवर सुरू आहे.

घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल, एनडीआरएफ, पोलीस आणि महापालिकेचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. जेसीबी, क्रेन आणि इतर यंत्रसामग्रीच्या सहाय्याने ढिगारा हटवून अडकलेल्यांचा शोध घेण्याचे काम सुरू आहे. परिसरात मोठी गर्दी झाली असून सुरक्षिततेच्या कारणास्तव नागरिकांना घटनास्थळापासून दूर ठेवण्यात येत आहे.

या घटनेनंतर कचरा डेपोला लागून असलेल्या इमारतीच्या सुरक्षिततेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत. एवढ्या मोठ्या कचरा डेपोशेजारी इमारत उभारण्यास परवानगी कशी देण्यात आली, तसेच संभाव्य धोका लक्षात घेऊन आवश्यक उपाययोजना का करण्यात आल्या नाहीत, याबाबत प्रशासनावर टीका होत आहे.

दरम्यान, अडकलेल्या कर्मचाऱ्यांची नेमकी संख्या आणि जीवितहानीबाबत अधिकृत माहिती अद्याप जाहीर करण्यात आलेली नसून, बचावकार्य पूर्ण झाल्यानंतरच याबाबत स्पष्ट माहिती समोर येणार आहे.