पुणे ग्रामीण पोलिसांची मोठी कारवाई; तीन सराईत चोरटे जेरबंद, तीन घरफोडी उघडकीस – ५.२० लाखांचा मुद्देमाल जप्त.
सासवड : ४ जुलै ka; पुणे ग्रामीण पोलिसांच्या सासवड पोलीस ठाण्याने घरफोडीच्या गुन्ह्यांचा छडा लावत तीन सराईत चोरट्यांना अटक केली आहे. या कारवाईत तीन घरफोडीचे गुन्हे उघडकीस आले असून, सुमारे ₹५ लाख २० हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
सासवड पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या घरफोडीच्या गुन्ह्यांचा तपास करताना पोलिसांनी गुप्त माहितीच्या आधारे आरोपींचा शोध घेतला. तपासादरम्यान आरोपी चोरीसाठी पॅशन प्रो आणि हिरो डिलक्स या दोन मोटारसायकलींचा वापर करत असल्याचे निष्पन्न झाले.
अटक आरोपी :
बाबू इमरान माळी (वय २७, रा. नाकडा, ता. माण, जि. सातारा)
रोहित शिवाजी भिसे (वय २८, रा. नाकडा, ता. माण, जि. सातारा)
दिलीप गोरख माळी (वय २५, रा. नाकडा, ता. माण, जि. सातारा)
पोलिसांनी आरोपींकडून दोन मोटारसायकली, साडेतीन तोळे सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम असा एकूण ₹५.२० लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
तपासात आरोपींविरुद्ध सातारा, कोरेगाव आणि खटाव परिसरात घरफोडी व चोरीचे आणखी गुन्हे दाखल असल्याचेही उघड झाले आहे.
ही कारवाई पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल यांच्या मार्गदर्शनाखाली, सासवड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रल्हाद खैरनार यांच्या नेतृत्वाखालील पथकाने केली.