राज्यात पावसाचा जोर वाढला; सोमवारपर्यंत मुसळधार पावसाचा इशारा, अनेक घाटांत दरडी कोसळल्या.

Pune:४ जुलै:अरबी समुद्रात तब्बल १५ दिवस रेंगाळल्यानंतर मान्सूनने अखेर संपूर्ण महाराष्ट्र व्यापला असून राज्यभर जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे. रखडलेल्या पेरणीच्या कामांना गती मिळाल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. मात्र, मुंबई, ठाणे, रायगड, पुणे आणि कोकणातील अनेक भागांत मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे.
हवामान विभागाने रायगड आणि पुणे जिल्ह्यांना ‘रेड अलर्ट’, तर मुंबई, ठाणे आणि पालघरला ‘ऑरेंज अलर्ट’ जारी केला आहे. अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये, असे आवाहन प्रशासनाने नागरिकांना केले आहे.
कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात ६ जुलैपर्यंत अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला असून, घाटमाथ्यावरील त्र्यंबकेश्वर, इगतपुरी, भीमाशंकर, लोणावळा, ताम्हिणी, महाबळेश्वर, आंबा, गगनबावडा यांसह अनेक घाटांमध्ये अतिवृष्टीची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.
दरम्यान, कोल्हापूर-सिंधुदुर्गला जोडणाऱ्या करूळ घाटात मोठी दरड कोसळल्याने सुमारे दोन तास वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली. तसेच आंबा घाटातही पुन्हा दरड कोसळल्याने रत्नागिरी-नागपूर महामार्गावरील वाहतुकीवर परिणाम झाला.
सिंधुदुर्गातील आंबोली येथे चार दिवसांच्या मुसळधार पावसानंतर मुख्य धबधबा पूर्ण क्षमतेने प्रवाहित झाला असून वर्षा पर्यटनाला सुरुवात झाली आहे.
दुसरीकडे, पुणे जिल्ह्यातील लोणी काळभोर येथे पावसाच्या पाण्याने भरलेल्या उघड्या खड्ड्यात पडून सोहम लखन कसबे (वय २) या चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. कंत्राटदाराच्या निष्काळजीपणामुळे ही घटना घडल्याचा आरोप होत आहे.
रत्नागिरी जिल्ह्यातील जगबुडी नदीने इशारा पातळी ओलांडली असून नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
हवामान विभागाच्या अंदाजानुसार सोमवारपर्यंत राज्यातील बहुतांश भागात मुसळधार पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता असून नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.