Home Breaking News पुणे ग्रामीण पोलिसांची धडक कारवाई; इंदापूरमध्ये खुनाचा प्रयत्न उघड, रांजणगावात जबरी चोरीतील...

पुणे ग्रामीण पोलिसांची धडक कारवाई; इंदापूरमध्ये खुनाचा प्रयत्न उघड, रांजणगावात जबरी चोरीतील तीन आरोपी जेरबंद.

29
0
पुणे ग्रामीण पोलिसांची धडक कारवाई; इंदापूरमध्ये खुनाचा प्रयत्न उघड, रांजणगावात जबरी चोरीतील तीन आरोपी जेरबंद.

 

पुणे, दि. 30 जून : पुणे ग्रामीण पोलिसांनी दोन गंभीर गुन्ह्यांमध्ये जलद कारवाई करत आरोपींना अटक केली असून, इंदापूर येथे खुनाच्या प्रयत्नाच्या प्रकरणात चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर रांजणगाव एमआयडीसी परिसरातील जबरी चोरीच्या गुन्ह्यात तीन आरोपींना अटक करून 80 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

इंदापूरमध्ये जुन्या वादातून जीवघेणा हल्ला; चार जणांवर खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा.

इंदापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील काटेवाडी येथे जुन्या वादातून एका व्यक्तीवर धारदार शस्त्र आणि लोखंडी रॉडने हल्ला करण्यात आला. आरोपींनी फिर्यादीला शिवीगाळ करत मारहाण केली तसेच “तुला जिवंत सोडणार नाही” अशी धमकी दिली. या हल्ल्यात फिर्यादी गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत.

या प्रकरणी इंदापूर पोलिसांनी चार आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या संबंधित कलमान्वये खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल केला आहे. आरोपींचा शोध आणि पुढील तपास सुरू आहे.

रांजणगाव एमआयडीसीमध्ये जबरी चोरी; तीन आरोपी अटकेत.

रांजणगाव एमआयडीसी परिसरात फिर्यादीला अडवून मारहाण करत त्याच्याकडील मोबाईल फोन आणि रोकड जबरदस्तीने हिसकावून नेल्याची घटना घडली होती. गुन्हा दाखल होताच पोलिसांनी तातडीने तपास सुरू करून तीन आरोपींना अटक केली.

तपासादरम्यान आरोपींकडून एकूण 80 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. यात चार मोबाईल फोन, दोन दुचाकी आणि गुन्ह्यात वापरलेले साहित्य जप्त करण्यात आले आहे.

पुणे ग्रामीण पोलिसांनी दोन्ही प्रकरणांमध्ये तातडीने कारवाई करत आरोपींविरुद्ध कायदेशीर प्रक्रिया सुरू केली असून, पुढील तपास संबंधित पोलीस ठाण्यांकडून सुरू आहे.