Home Breaking News पुणे:सेवेचा संकल्प, आरोग्यसेवेचा विस्तार : पुण्यात ‘लताआशा मंगेशकर इन्स्टिट्यूट’चे कोनशिला अनावरण

पुणे:सेवेचा संकल्प, आरोग्यसेवेचा विस्तार : पुण्यात ‘लताआशा मंगेशकर इन्स्टिट्यूट’चे कोनशिला अनावरण

40
0

पुणे:सेवेचा संकल्प, आरोग्यसेवेचा विस्तार : पुण्यात ‘लताआशा मंगेशकर इन्स्टिट्यूट’चे कोनशिला अनावरण

रा. स्व. संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज पुणे येथे ‘लताआशा मंगेशकर इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस’चे कोनशिला अनावरण पार पडले.

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, ज्येष्ठ गायिका, पद्मविभूषण व महाराष्ट्र भूषण आशा भोसले या आपले जीवन नेहमी उत्सवाप्रमाणे जगल्या. आशाताईंनी जीवनातील कटू अनुभवांना सकारात्मकतेत परिवर्तित केले. त्यांच्या व्यक्तिमत्वात जिवंतपणा ठासून भरलेला होता. त्यांनी कधीही नकारात्मकतेला जवळ येऊ दिले नाही. आशाताईंनी वयाच्या नव्वदीत तीन तासांची मैफल केल्याचे आपण पाहिले, हे अलौकिक आहे. 

आशाताई व संपूर्ण मंगेशकर कुटुंबाने केलेली संगीतसेवा सर्वपरिचित आहे. मंगेशकर कुटुंबाने संगीतसेवेसोबतच देशाभिमान बाळगून देशसेवेचेही कार्य केले. देशासमोरील संकटांमध्ये आपल्याकडून काय करता येईल असा विचार करून त्यांनी अनेकांना मदत केल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी नमूद केले. 

मंगेशकर कुटुंब दीनानाथ मंगेशकर रुग्णालय व रिसर्च सेंटरच्या माध्यमातून सेवाभाव जपत हजारो नागरिकांना उत्तम आरोग्यसेवा देण्याचे कार्य करत आहे. या रुग्णालयात परवडणाऱ्या दरात उपचार केले जातात. अशीच सेवा ‘लताआशा मंगेशकर इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस’च्या माध्यमातून पुरवली जाईल, असा विश्वास मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी व्यक्त केला.

या रुग्णालयापर्यंत येणारा रस्ता अधिक थेट व रुंद कसा करता येईल, पाण्याची योग्य व्यवस्था कशी करता येईल यासाठी प्रयत्न करणार असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी नमूद केले.

यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, मंत्री चंद्रकांत पाटील, आमदार भीमराव तापकीर, आमदार सिद्धार्थ शिरोळे, आमदार हेमंत रासने, पुण्याच्या महापौर मंजुषा नागपुरे, लता मंगेशकर फाउंडेशनचे अध्यक्ष पंडित हृदयनाथ मंगेशकर, उषा मंगेशकर व इतर मान्यवर उपस्थित होते.