जालना जिल्ह्यातील मोठी कारवाई! वाळू उत्खनन प्रकरणात अंबडचे तहसीलदार विजय चव्हाण ACBच्या जाळ्यत लाच घेताना रंगेहात अटक.

जालना : जालना जिल्ह्यातील अंबडचे तहसीलदार विजय चव्हाण यांना 6 लाख 40 हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) रंगेहात पकडल्याने जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे. गोदावरी नदीपात्रातील वाळू उत्खननाशी संबंधित व्यवहारात ही कारवाई करण्यात आली असून छत्रपती संभाजीनगर येथील त्यांच्या निवासस्थानी सापळा रचून ACBने त्यांना ताब्यात घेतले.
तक्रारदाराच्या म्हणण्यानुसार, वाळू उत्खननासाठी वापरण्यात येणारी यंत्रसामग्री आणि वाहने यांच्यावर कारवाई होऊ नये तसेच कामकाजात अडथळे निर्माण होऊ नयेत यासाठी मोठ्या रकमेची मागणी करण्यात आली होती. तक्रारदाराने याबाबत ACBकडे तक्रार दाखल केल्यानंतर पडताळणी करून बीड ACBच्या पथकाने सापळा रचला.
कारवाईदरम्यान विजय चव्हाण यांनी 6 लाख 40 हजार रुपयांची लाच स्वीकारताच अधिकाऱ्यांनी त्यांना रंगेहात पकडले. या प्रकरणातील महत्त्वाचे पुरावे जप्त करण्यात आले असून पुढील तपास सुरू आहे. तसेच छत्रपती संभाजीनगरमधील सातारा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
विशेष म्हणजे, गुरुवारीच ACBने बीड जिल्ह्यातील नेकनूर येथे एका पोलीस अंमलदाराला 10 हजार रुपयांची लाच घेताना अटक केली होती. त्यामुळे एका दिवसात महसूल आणि पोलीस विभागातील दोन अधिकाऱ्यांवर झालेल्या कारवाईमुळे प्रशासकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
विविध प्रशासकीय उपक्रम आणि नागरिकांशी थेट संपर्कामुळे ओळख निर्माण केलेल्या विजय चव्हाण यांच्या अटकेमुळे सर्वसामान्यांमध्येही आश्चर्य व्यक्त होत आहे. काही महिन्यांपूर्वी संतोष खांडेकर यांच्यावरही लाचखोरीच्या आरोपांमध्ये कारवाई झाली होती. त्यामुळे जालना जिल्ह्यातील भ्रष्टाचाराचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून या प्रकरणात आणखी धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.